उपचार वेळेवर न मिळाल्यामुळे अपेक्षेपेक्षा अधिक रुग्ण

मयूर ठाकूर, लोकसत्ता

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात क्षयरोग आणि कुष्ठरोग रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यंदा क्षयरोगाच्या  अपेक्षित केलेल्या रुग्णांमध्ये तब्बल ३४ रुग्णांची वाढ झाली असून एकूण आकडा २३४ वर पोहोचला आहे, तर १५ रुग्णांना कुष्ठरोग आजार झाल्याचे निष्पन्न झाले.

मिरा-भाईंदर शहरातील  क्षयरोग आणि कुष्ठरोग  रुग्णांचे निदान करण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण करण्यात येते. यंदा हे सर्वेक्षण १ डिसेंबर ते ३० डिसेंबर या काळात शहरात केले होते. यातील १ डिसेंबर ते १५ डिसेंबर कालावधीत आरोग्य कर्मचाऱ्यांनी  प्रत्यक्ष नागरिकांच्या घरोघरी जाऊन तपासणी केली. शहराची साधारण  ९ लाख ६ हजार ६६० लोकसंख्या आहे. तर ६ लाख ७८ हजार ७४८ घरे आहेत. यासाठी ९ मनपा प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर १२४ पथके तयार केली होती. त्यानुसार दररोज अंदाजे ४ हजार ५८६ घरांना भेटी देण्यात आल्या.

सर्वेक्षणानुसार ६३०९ संशयित क्षयरुग्ण आढळले असून यातून २३४ क्षयरोगबाधितांचे निदान झाले आहे. तसेच  ५३६ संशयित कुष्ठरोग रुग्ण आढळले असून यातून १५ कुष्ठरोगबाधितांचे निदान झाले आहे. त्यामुळे या रुग्णांच्या उपचारावर भर देण्यात येत असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

करोनामुळे रुग्णसंख्येत वाढ

टाळेबंदीच्या काळात आरोग्य केंद्र करोनासाठी कार्यरत होती. त्यामुळे क्षयरोग आणि कुष्ठरोग रुग्णांच्या चाचण्याही मर्यादित होत होत्या. तसेच करोना आणि क्षयरोगाची लक्षणे सारखी असल्याने अनेक जण भीतीने तपासणीसाठी गेले नसल्याची माहिती सर्वेक्षणात समोर आली असल्याची माहिती पालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. बालनाथ चकोर यांनी दिली.