शहरात करोना नियमांचे पालन न करणाऱ्यांच्या संख्येत वाढ

विरार : वसई विरार परिसरात करोना मोठ्या झपाट्याने पाय पसरत आहे. पालिकेकडून करोना प्रसारावर नियंत्रण मळविण्यासाठी वेगवेगळे निर्बंध लादले जात आहेत. पण नागरिकांकडून त्याचे पालन होताना दिसत नाही. पालिकेने महिनाभरात अशा हजारो नागरिकांवर कारवाई करत १६ लाख ४० हजार २०० रुपयांचा दंडवसुली केली आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच शहरात करोनाबाधित रुग्णाची संख्या वाढू लागली आहे. मार्च महिन्यात शहरात करोनाचे तब्बल २ हजार ८०० रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे  महानगरपालिका आयुक्त गंगाथरन डी. यांनी कडक निर्बंध लागू केले होते.  प्रभाग समिती स्तरावर दैनंदिन व आठवडे बाजार बंद करण्यात आले होते. दुकाने, मॉल, हॉटेल्स, रेस्टॉरंट, इ.मध्ये होणारी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी  सूचना केल्या होत्या. मुखपट्ट्यांचा वापर न करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पालिकेच्या सर्वच प्रभागांत कारवाई करण्यात येत आहे.

त्यानुसार पालिकेने एकाच महिन्यात १६ लाख रुपये दंडाची कारवाई केली आहे. प्रभाग समिती अ मध्ये १ लाख ९ हजार २००,  प्रभाग समिती ब मध्ये ८८ हजार ८००, प्रभाग समिती ‘सी’मध्ये १ लाख ५ हजार ४०० रुपये, प्रभाग समिती ‘डी’मध्ये २ लाख २ हजार २००, प्रभाग समिती ‘ई’मध्ये ७८ हजार ८०० रुपये, प्रभाग समिती ‘एफ’मध्ये १ लाख ५५ हजार रुपये, प्रभाग समिती ‘जी’मध्ये ६ लाख ७७,२०० रुपये, प्रभाग समिती ‘आय’मध्ये ८८ हजार रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे.   सर्वाधिक पावणेसात लाखांचा दंड प्रभाग समिती जी (वालीव) मधून वसूल करण्यात आला आहे. गुरुवार, १ एप्रिल रोजी केलेल्या कारवाईत मास्कचा वापर न केलेल्या ६० व्यक्तींकडून १२००० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर कोविड-१९ मार्गदर्शिकेचे अनुपालन न करणाऱ्या हॉटेल्सकडून ४० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

टाळेबंदीच्या नियमांकडे दुर्लक्ष

राज्य शासनाने २८ मार्चपासून राज्यात रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत संचारबंदी लागू केली आहे. रात्री ८ नंतर सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र वसई विरार शहरात वेळेच्या मर्यादनेनंतरही दुकाने आणि बाजारहाट सुरूच असल्याचे चित्र दिसून येत आहे. सर्व प्रकारचे उत्सव, सार्वजनिक कार्यक्रम आणि आठवडा बाजारावर बंदी आणली आहे. असे असतानाही नागरिक नियमांचे पालन करत नाहीत. शहरात अनेक ठिकाणी बाजार गर्दीने फुलून जात आहेत. तर अनेक जण कारवाई होऊ नये म्हणून मुखपट्ट्या घातल्याचा बनाव आणत आहेत.

पालिका नागरिकांना वेळोवेळी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत आहे, पण अनेक ठिकाणी नागरिक नियम डावलत असल्याने नाइलाजाने पालिकेला कारवाई करावी लागत आहे. यामुळे नागरिकांनी नियम जोपासून पालिकेला सहकार्य करावे. -नीलेश जाधव, साहाय्यक आरोग्य अधिकारी, वसई-विरार महानगरपालिका