करोनामुळे मार्चपासून अचानक अडखळलेला अर्थव्यवस्थेचा गाडा अद्याप रुळावर आलेला नाही. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील अर्थचक्रच अजूनही कसेबसे पुढे सरकत आहे. जुलैपासून शिथिलीकरणाच्या प्रक्रि येने वेग घेतला. परंतु, दळणवळणाच्या साधनांचा अभाव, मागणीचा अभाव, कारागीर, कामगारांची कमतरता यांमुळे व्यवसायाला म्हणावा तसा जोर नाही. या सगळय़ांचा परिणाम सर्वसामान्यांच्या क्रयशक्तीवरही झाला आहे. ग्राहकांकडून प्रतिसाद नसल्याने सुरू झालेल्या बाजारपेठाही कशाबशा दिवस ढकलत आहेत. अर्थात ऑनलाइन वस्तूंची विक्री किंवा घरपोच डिलिव्हरी या माध्यमांतून किरकोळ व्यापारी व्यवसायात तग धरून राहण्याचा प्रयत्न करत आहेत. किरकोळ व्यापारी, दुकानदार यांच्या सद्य:स्थितीबाबत ‘फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशन’चे अध्यक्ष विरेन शाह यांच्याशी साधलेला संवाद.

आठवडय़ाची मुलाखत – विरेन शाह , अध्यक्ष, फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशन

Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

* प्रश्न : मुंबई महानगर प्रदेशातील किरकोळ व्यापाराची सद्य:स्थिती काय आहे?

मुंबई महानगर प्रदेशात सुमारे २ लाख दुकाने आहेत. यातील दीड लाख दुकानेच उघडली आहेत. तर जवळपास ३० ते ४० हजार दुकाने अद्याप बंद आहेत. अनेकांनी दुकाने कायमस्वरूपी बंद केली आहेत. दुकाने उघडल्यावर भाडे, पगार द्यावा लागेल म्हणून अनेक दुकाने बंद आहेत. कामगार कामावर येऊ शकत नसल्यानेही दुकाने उघडण्यात अडचणी आहेत. या दुकानांमध्ये १२ ते १५ लाख कामगार काम करतात. आजघडीला लाखो कामगार कामावर पोहचूच शकत नाहीत. सुमारे ५० टक्के कामगार बेरोजगार झाले आहेत. करोनाच्या भीतीमुळे मुंबई शहर आणि परिसरातील ग्राहक अत्यावश्यक गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठीच घराबाहेर पडत आहे. मागील दोन महिन्यांत विक्रीत फारशी वाढ झाली नाही. मागील वर्षी याच काळाच्या तुलनेत यंदा दुकानदारांचा ६० ते ७० टक्के व्यवसाय बुडाला आहे.

* प्रश्न : टाळेबंदी शिथिलीकरणाचा दुकानदारांना काही फायदा झाला का?

टाळेबंदी शिथिलीकरणाचा दुकानदारांना फायदा झाला नाही. याउलट गरजेच्या कामासाठी घराबाहेर पडावे, विनाकारण बाहेर पडू नका, असे सरकारकडून दरवेळी सांगितले जाते. त्यामुळे लोक बाहेर येत नाहीत. सध्या सात वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवू शकतो. नागरिक घराबाहेर येत असले, तरी ते मुख्यत: कार्यालयात जात आहेत. खरेदीसाठी येणाऱ्यांची संख्या मर्यादितच आहे. त्यातच वाहतूक पोलिसांकडून कडक धोरण अवलंबले जात आहे. ते गाडय़ा उभ्या राहू देत नाही. त्यामुळे खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना अडचणी येतात.

*  प्रश्न :  सरकारकडून कोणत्या मदतीची अपेक्षा आहे?

नागरिकांना बाजारात येण्यासाठी लोकल रेल्वेसेवा सुरू करावी. राज्य सरकारने मालमत्ता कर माफ करावा. तर केंद्र सरकारने ‘जीएसटी’ दरात कपात करावी आणि पेट्रोल-डिझेल यांचा ‘जीएसटी’त समावेश करावा. पेट्रोल-डिझेलवर राज्य सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या करातही कपात व्हायला हवी. विजेवरील कर कमी करावेत. सरकारने या उपाययोजना करणे आवश्यक आहे. यातून दुकानदारांना काहीसा दिलासा मिळेल. सरकार हे करू शकते. मात्र करोनाची स्थिती सुधारण्यावर सध्या भर आहे. सरकार लोकांच्या उपचारांवर लक्ष केंद्रित करत आहे. लोकांचे जीव वाचविण्याचा प्रयत्न आहे, ही चांगली बाब आहे.

* प्रश्न : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजचा तुम्हाला लाभ झाला का? काय अपेक्षा आहेत तुमच्या?

केंद्र सरकारच्या पॅकेजचा व्यापाऱ्यांना अद्याप कोणताच फायदा दिसत नाही. केंद्र सरकारच्या हातात बऱ्याच गोष्टी आहेत. केंद्र सरकारने जीएसटी दर कमी करायला हवेत. प्राप्तिकरात बदल केला पाहिजे. पेट्रोल डिझेलचा जीएसटीत समावेश करायला हवा. त्याचबरोबर लोकांच्या खात्यात दरमहिना थेट पैसे जमा करावे लागतील. बाजारात पैसा आल्याशिवाय अर्थचक्र  सुरू होणार नाही. व्यवसाय पूर्ववत होण्यासाठी लोकांच्या हातात पैसे यायला हवेत.

* प्रश्न : व्यवसाय कधीपर्यंत पूर्ववत होईल, असे तुम्हाला वाटते?

बाजारात लस येईपर्यंत व्यवसाय पूर्ववत होणे अवघड आहे. देशातील १३० करोड लोकांना लस मिळाल्यानंतरही व्यवसाय सावरण्यास (तोही ७० टक्क्यांपर्यंत) येण्यास वर्ष जाईल. तर व्यवसाय ८० टक्क्यांपर्यंत येण्यास दोन वर्ष्ेा लागतील. तेही अर्थव्यवस्था, सरकारची धोरणे, खर्च आणि कर यांवर सर्वकाही अवलंबून आहे. मात्र करवाढ झाल्यास दुकाने बंद होतील. ऑनलाइन मार्केटिंगला चालना दिल्यास त्या क्षेत्राला फायदा होईल. मात्र याचा परिणाम किरकोळ व्यापारावर होऊन या व्यवसायाला मोठय़ा नुकसानाला सामोरे जावे लागेल. शेती क्षेत्रानंतर या व्यवसायातून सर्वात जास्त रोजगार प्राप्त होतो. देशभरात जवळपास ४ कोटी व्यापारी आहेत. या क्षेत्रावर संकट आल्यास अनेकजण बेकार होतील.

*  प्रश्न : दसरा-दिवाळीत परिस्थिती बदलू शकते का?

टाळेबंदीनंतरच्या सर्व सणात विक्री झाली नाही. लोक नवीन कपडे घालून बाहेर जातील, कोणते कार्यक्रम होतील याची सध्या शक्यता नाही. त्यामुळे दिवाळीतही मोठय़ा व्यवसायाची अपेक्षा नाही.

(शब्दांकन- अमर सदाशिव शैला)