चित्रपटसृष्टीच्या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये ‘रेड कार्पेट’ संकल्पनेला खूप महत्त्व आहे. सिने तारे आणि तारकांना या ‘रेड कार्पेट’वरील आदबशीर प्रवेश सगळ्यांना त्यांची ओळख करून देणारा असा असतो. याच संकल्पनेचा आधार घेऊन ठाण्यातील श्री आनंद भारती संस्थेने ज्येष्ठांसाठी ‘रेड कार्पेट’चा अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे. ठाण्यातील श्री आनंद भारती संस्थेच्या वतीने बुधवारी १३ मे रोजी ‘ज्येष्ठोत्सव’ आयोजित केला असून यामध्ये संस्थेच्या ७८ ज्येष्ठ नागरिकांची ओळख नव्या पिढीला करून देण्यात येणार आहे.       
ठाण्यातील श्री आनंद भारती संस्था गेली १०४ वर्षांपासून शहरात सामाजिक आणि सेवाभावी काम करत असून या संस्थेच्या वतीने बुधवार १३ मे रोजी ज्येष्ठोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नखवा स्मृती सप्ताहात श्री आनंद भारती व्यायामशाळेच्या प्रशस्त क्रीडांगणावर हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात ७० ते ९६ वर्षे वयोगटातील ४२ पुरुषांचा तर ३६ महिलांचा गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे कार्यवाह संदीप कोळी यांनी दिली. संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुलोचना खाडविलकर या ९६ वर्षांच्या आहेत. तर संस्थेचे कार्याध्यक्ष हरेश्वर मोतिराम मोरेकर यांनी ७१ व्या वर्षांत पदार्पण केले आहे. ज्येष्ठ अभिनेते व निर्माते याकुब सईद व अभिनेते जयंत सावरकर यांच्या हस्ते या ज्येष्ठांचा गौरव करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा सन्मान करण्याबरोबरच मुलाखत आणि स्नेहभोजन, असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे. ज्येष्ठ नागरिकांना अशा प्रकारे पायघडय़ांवरून जगासमोर आणण्याचा हा प्रयत्न असून संस्थेसाठी यातील प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची आहे. त्यांच्या कार्याचा गौरव या कार्यक्रमातून होईल असे, कोळी म्हणाले.