कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात मोठय़ा प्रमाणात आर्थिक फायदा होत असल्याचे आमिष दाखवून कुक्कुट पालन व्यवसायात  ९ शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची तक्रार नालासोपारा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. यात शेतरकम्य़ांची ३३ लाख ७५ हजाराला फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे.  यामुळे कंपनीचे संस्थापक, संचालक, भागीदारांवर नालासोपारा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगली राज्यातील इस्लामपूर येथील रयत अ‍ॅग्रो इंडिया प्रा.लि. कंपनी आणि त्यानंतर या कंपनीचे नामांतर करून त्याचे महारयत अ‍ॅग्रो इंडिया असे नाव झाले. या कंपनीत संस्थापक व अध्यक्ष सुधीर शंकर मोहिते, संचालक संदीप सुभाष मोहिते, भागीदार विजय शेंडे आणि इतर कंपनीचे भागीदार यांनी आर्थिक फायद्यसाठी नालासोपारा येथील अजित गंगाराम वझे यांच्याकडून ३ लाख ७५ हजार, वाणगाव येथील जितेंद्र जगन्नाथ पाटील यांच्याकडून ५ लाख २५ हजार, आणि इतर शेतकरम्य़ांकडून असे ३३ लाख ७५ हजार रुपये घेतले. पण कराराप्रमाणे कोणत्याही अटींचे पालन केले नाही. आणि अचानक कंपनी बंद करून फरार झाले.

माहिती गोळा करण्याचे काम सुरू

शेतकऱ्यांचे पैसे परत देण्याचे वेळोवेळी खोटे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक केली आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर अजित गंगाराम वझे यांनी सोमवारी नालासोपारा पोलीस ठाण्यात जाऊन कंपनी व संचालक, भागीदारांविरोधात तक्रार देऊन  गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तपास सुरु असून संचालकांची माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे तसेच यात इतरही शेतकऱ्यांची फसवणूक झाली असल्याची शक्यता नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लबदे यांनी सांगितले.