लहान मुलांप्रमाणे कुत्रा, मांजर, पोपट हे पाळीव प्राणीही केवळ लळाच लावत नाहीत, तर महानगरी जीवनशैलीमुळे अपरिहार्यपणे येणारा ताणही हलका करतात. त्यामुळे अनेक घरात त्यांचा अगदी मुलाप्रमाणे सांभाळ केला जातो. असे असले तरी विभक्त कुटुंबातील पती-पत्नी दोघेही दिवसभर नोकरीनिमित्ताने बाहेर आणि मुले पाळणाघरात असल्याने प्राण्यांना कुठे ठेवणार असा प्रश्न निर्माण होतो. मात्र,  चरईत राहणाऱ्या कल्पा कोरडे यांनी चक्क श्वानांसाठी पाळणाघर सुरू करून अशा प्राणीमित्रांची सोय केली आहे.  
लहानपणापासूनच कल्पा यांचे प्राण्यांवर खूप प्रेम आहे. लग्नानंतरही त्यांनी त्यांची ही आवड कसोशीने जपली. त्यांच्या नातेवाईकांकडे आणि मित्र-मैत्रीणींकडेही श्वान आहेत. बाहेरगावी जाताना ते त्यांचे श्वान कल्पा यांच्याकडे ठेवून जात. त्यातूनच त्यांना वेगवेगळ्या जातीचे श्वान सांभाळण्याची सवय झाली. आतापर्यंत त्यांनी जर्मन शेर्फड, पग, पॉमेलिअन, लॉब्राडोर, डॉबरमॅन, रॉटविलर, बुलडॉग, बॅक्सर आदी जातीचे श्वान सांभाळले आहेत. गेली सहा वर्षे त्या व्यावसायिक पद्धतीने श्वानांचे पाळणाघर चालवितात.
काही श्वान हे स्वभावाने रागीट किंवा अनोळखी व्यक्तीवर हल्ला करणारे असतात, तर काही खूपच प्रेमळ असतात. अशा विविध स्वभावांच्या श्वानांसोबत गेली काही वर्ष जीवनाचा आनंद घेतला, असे कल्पा कोरडे यांनी सािंगतले. कोणत्याही बाबतीत कुत्र्यांची होणारी हेळसांड त्यांना सहन होत नाही. लस दिल्यानंतर कुत्र्यांना कमीत कमी चार दिवस तरी इस्पितळात ठेवावे, असा नियम आहे. मात्र हल्ली त्यामध्येही हलगर्जीपणा केला जातो व त्यामुळे त्या कुत्र्यांना अपंगत्व येण्याची शक्यता असते. श्वांनाच्या बाबतीत सर्वसामान्याना पुरेसे ज्ञान नसल्याने बाजारात असणारे प्रशिक्षक, केअर टेकर्सकडून श्वानांची चक्क फसवणूक होते. या सर्व बाबींना आळा बसावा या उद्देशाने अगदी कमी शुल्कात हे पाळणा घर सुरू केले, अशी माहिती कल्पा कोरडे यांनी दिली.   
श्वानांची देखभाल करणाऱ्यांमध्ये पुरुषांचीच मक्तेदारी आहे. कल्पा कोरडे यांनी या क्षेत्रातही महिला उत्तम काम करू शकतात, हे पाळणाघर यशस्वीपणे चालवून दाखवून दिले आहे. येथे अतिशय उत्तम प्रकारे श्वानांची काळजी घेतली जाते, असा अभिप्राय श्वानाचे पालक आवर्जून नोंदवितात.  

श्वानांची स्वतंत्र व्यवस्था
दररोज कल्पा यांच्याकडे चार ते पाच श्वान सांभाळण्यासाठी असतात. तसेच कुणी बाहेरगावी जाणार असल्यास एक ते दोन महिन्यांसाठी ही त्यांच्याकडे श्वान सांभळण्यासाठी येत असतात. कल्पा यांची स्वत:ची इमारत असल्याने संपूर्ण गच्ची त्यांनी श्वानांना खेळण्यासाठी ठेवली असून, त्यांच्या राहत्या घरामध्ये त्यांना झोपण्यासाठी एक मोठी खोली आहे. श्वानांचे एक वैशिष्टय़ म्हणजे त्यांना स्वत:चा वास असणाऱ्या वस्तू लागतात. म्हणून कल्पा नेहमी श्वानांच्या पालकांकडून त्यांचे जेवणाचे भांडे, अंथरुण, खेळणी औषधे आदी वस्तू मागवून घेतात. त्यांना लागणाऱ्या इतर सर्व सोयी त्यांच्याजवळ उपलब्ध आहेत.