20 November 2017

News Flash

कल्याण, शहापूरमध्ये दोन महिलांनी दिला तिळ्यांना जन्म

तिळ्यांना पाहण्यासाठी नातेवाईकांची रुग्णालयांमध्ये गर्दी

कल्पेश गोरडे, ठाणे | Updated: July 15, 2017 6:47 PM

शहापूर येथील गाडगे महाराज रुग्णालयात एका महिलेने तिळ्यांना जन्म दिला.

ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे एका महिलेने तिळ्यांना जन्म दिला. तर शहापूर येथेही एका महिलेने तिळ्यांनाच जन्म दिला. या दोन्ही माता आणि त्यांच्या नवजात बालकांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

कल्याण पूर्वेतील पत्रीपूल परिसरात राहणाऱ्या शबाना दस्तगीर शेख या महिलेला आज प्रसूती वेदना सुरु झाल्या. शबाना यांना पहाटेच्या सुमारास मुरबाड रोडवरील सिंडीगेट येथील वैष्णवी नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांनी काही मिनिटांच्या अंतरानेच दोन मुली आणि एक मुलाला जन्म दिला. मातेसह तिळ्यांची प्रकृती ठणठणीत आहे. तीनही बालके सुदृढ आहेत, असे डॉ. प्रेरणा निकम यांनी सांगितले. शबाना यांच्यावर गरोदरपणापासूनच डॉ. अश्विन कक्कर यांच्या वैष्णवी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. आज शनिवारी प्रसूती वेदना सुरु झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. नैसर्गिकरित्या प्रसूती झाली असून, माता आणि बाळ सुखरूप आहेत. याआधी दोनदा या रुग्णालयात मातांनी तिळ्यांना जन्म दिला आहे. ही तिसरी घटना आहे, अशी माहितीही वैष्णवी हॉस्पिटलचे डॉ. अश्विन कक्कर यांनी दिली.

तर शहापूर तालुक्यातील वशिंद येथील गाडगे महाराज हॉस्पिटलमध्येही एका महिलेने तिळ्यांना जन्म दिला आहे. माता आणि तिन्ही बालके सुखरूप आहेत, असे डॉ. लता बोऱ्हाडे यांनी सांगितले. तिळ्यांना बघण्यासाठी त्यांचे नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी रुग्णालयात गर्दी केली होती.

First Published on July 15, 2017 6:47 pm

Web Title: kalyan and shahapur womens delivered each three healthy boys