03 March 2021

News Flash

कल्याणमध्ये खासगी बस वाहतूकदारांमुळे कल्याण-डोंबिवली पालिकेच्या महसुलावर परिणाम

नोकरदार, व्यावसायिकांना घरी व रेल्वे स्थानकांपर्यंत ये-जा करण्यासाठी झटपट वाहन मिळणे आवश्यक असते.

नव्याने विकसित होत असलेल्या कल्याणमधील आधारवाडी, गांधारी, बारावे, गोदरेज हिल्स भागात काही खासगी बस वाहतूकदार मोठय़ा प्रमाणात गृहसंकुल ते कल्याण रेल्वे स्थानक अशी प्रवासी वाहतूक करीत आहेत. या प्रवासी वाहतुकीमुळे कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. याविषयी सर्वच यंत्रणा मूग गिळून असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आधारवाडी भागात सुरूअसलेल्या खासगी बस वाहतुकीला कल्याणमधील मंत्रालयात वजन असल्याचे दाखविणाऱ्या एका लोकप्रतिनिधीचा आशीर्वाद असल्याची चर्चा आधारवाडी, गांधारे परिसरातील रहिवाशांमध्ये सुरूआहे. स्थानिक वजनदार राजकारणी मंडळी आणि भाई, दादांच्या आशीर्वादाने या खासगी बस चालविण्यात येत आहेत. या बसच्या वाहतूकदारांचे पालिकेतील काही नगरसेवकांशी स्नेहाचे संबंध असल्याने कुणीही या विषयावर उघडपणे बोलत नाहीत.

कल्याण रेल्वे स्थानकापासून दोन ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या आधारवाडी, बारावे, मोहने, अटाळी, खडकपाडा भागात नवीन गृहसंकुले विकसित झाली आहेत. या भागात ये-जा करण्यासाठी रिक्षा वाहतूक असते. परंतु रिक्षा नियमित मिळतात असे नाही. पालिकेच्या परिवहन उपक्रमाची बससेवा लुळीपांगळी असल्याने उपक्रमाच्या बस नियमितपणे नवीन गृहसंकुल भागात फिरकत नाहीत. याचा पुरेपूर फायदा खासगी वाहतूकदारांनी उचलला आहे.

नोकरदार, व्यावसायिकांना घरी व रेल्वे स्थानकांपर्यंत ये-जा करण्यासाठी झटपट वाहन मिळणे आवश्यक असते. ते वाहन मग कोणाचे असले तरी चालेल, अशी भावना या भागातील प्रवाशांची असते. परिवहन उपक्रमाच्या बस नवीन वस्तीकडे नियमित फिरकत नाहीत किंवा त्यांची वेळेवर वारंवारिता नाही. रिक्षा मिळाली तर तिचे भाडे अवाच्या सवा असते. त्यामुळे या भानगडीत पडण्यापेक्षा प्रवासी थेट खासगी वाहतूकदारांच्या बसमध्ये बसून प्रवास करीत आहेत, अशी माहिती या भागातील रहिवाशांनी दिली.

खासगी बसमुळे केडीएमटीचे आर्थिक नुकसान होत आहे. या बसना ठरावीक थांब्यांना परवानगी द्यावी. केडीएमटीच्या प्रवासी थांब्यावरील प्रवासी खासगी बसने उचलू नयेत, अशा तक्रारी केडीएमटी प्रशासनाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक अधिकारी, एमएमआरडीए वाहतूक प्राधिकरण यांना दिले आहेत; परंतु कोणती गंभीर कारवाई या खासगी बसचालकांवर होत नाही, अशी माहिती परिवहन उपक्रमातील एका अधिकाऱ्याने दिली.

उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी खासगी बसना फक्त गृहसंकुल ते थेट रेल्वे स्थानकाजवळील थांब्यावरील प्रवासी उचलण्याची व सोडण्याची मुभा दिली आहे; परंतु हे खासगी बसचालक केडीएमटी थांब्यावरील प्रवासी उचलत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. केडीएमटी उपक्रमाची सेवा सक्षम नसल्याने त्याचा लाभ खासगी बसचालक उचलत आहेत, अशी कबुली केडीएमटी उपक्रमातील एका सूत्राने दिली. वर्षांनुवर्षे खासगी बससेवा कल्याणमध्ये धावू लागल्या तर केडीएमटी उपक्रम कधीच नफ्यात येणार नाही, अशी भीती वाहतूकतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. परिवहन उपक्रम सक्षमपणे चालू लागला तर शहरातील रिक्षाचालक, खासगी बसचालक, मोटार प्रशिक्षण केंद्र चालक यांच्या व्यवसायावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे परिवहन उपक्रम रडतखडत चालेल अशीच व्यवस्था लोकप्रतिनिधी, अधिकारी, काही दलालांकडून करण्यात येत असल्याचे विश्वसनीय सूत्राने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2016 1:14 am

Web Title: kalyan private transport affected on kdmc finance
Next Stories
1 बदलापुरात कारचालकाचा ताबा सुटल्याने अपघात
2 डोंबिवलीत लाकडी गोदामाला आग
3 अटीतटीच्या लढतीत तिघांची मतदानाला दांडी
Just Now!
X