रेल्वे सुरक्षा दलाच्या कारवाईनंतर काही दिवस बेपत्ता झालेले फेरीवाले पुन्हा कल्याण स्थानकाबाहेरील स्कायवर परतले आहेत. या फेरीवाल्यांच्या गर्दीमुळे सर्वसामान्य रहिवाशांना येथून चालताना अडचणी येत आहेत.
कल्याण व डोंबिवलीतील  स्कायवॉकवर दररोज सुमारे ३० ते ४० फेरीवाले बसत आहेत. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. रेल्वे सुरक्षा दलाच्या उपायुक्त रुपाली अंभुरे यांच्याकडे काही महिन्यांपूर्वी तक्रारी आल्यानंतर स्थानिक रेल्वे पोलीस यंत्रणा फेरीवाल्यांना हटवण्यासाठी कार्यरत झाली होती. ही यंत्रणा पुन्हा सुस्तावली असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, या फेरीवाल्यांना हटविण्यासाठी महापालिका प्रशासन काहीही करताना दिसत नाही. डोंबिवलीतील फेरीवाल्यांच्या वाढत्या उपद्रवाविषयी स्थानिक नगरसेवक मूग गिळून गप्प बसत असल्याचे चित्र आहे. कल्याण रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांवर पालिका कर्मचाऱ्यांकडून कारवाई करण्यात येत नसल्यामुळे फेरीवाल्यांचा सुळसुळाट वाढला आहे.