कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ‘फ’ प्रभागातील पाथर्ली रस्त्यावरील तळ अधिक दोन मजली इमारत तीन वर्षांपासून रिकामी पडली आहे. या वास्तूचा गोदाम म्हणून वापर होत असून नागरिकांना त्याचा त्रास होत असल्याची तक्रार लोकप्रतिनिधींनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. पालिकेच्या नगररचना विभागाने विकासक प्रफुल्ल शहा यांना त्या जागेचा वापर थांबवावा, असे कळवूनही त्याचा वापर अद्याप होतच आहे.
पाथर्ली रस्त्यावरील सवरेदयनगर येथील दूरध्वनी केंद्रासाठी आरक्षित भूखंड असून विकासकाने सवरेदय हाइट्स नावाची इमारत येथे बांधली आहे. त्याच्या बाजूला दोन मजली इमारत गेल्या तीन वर्षांपासून बांधून पडलेली आहे. या जागेचा वापर अनधिकृतपणे होत असून हॅप्पी होमचे लोखंड घेऊन ट्रक येथे येतात. नागरिकांना याचा त्रास होत असून महापालिकेच्या ताब्यातील वास्तूचा अनधिकृत वापर थांबवावा, अशी मागणी स्थानिक नगरसेवक मनोज घरत व परिवहन समिती सदस्य दीपक भोसले यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.
सवरेदयनगर येथील भूखंड दूरध्वनी केंद्रासाठी राखीव आहे. दूरसंचार विभागाने महापालिकेला पंधरा दिवसांपूर्वी ही वास्तू ताब्यात देण्याची विनंती केली आहे. महापालिकेने वास्तू वापरण्यासाठी मोफत द्यावी अथवा भाडेतत्त्वावर द्यावी अशी विनंती केली आहे.
नगररचना विकास विभागाने विकासक शहा व वास्तुविशारद वैद्य यांना लेखी पत्र पाठवून अनधिकृत वापर थांबवावा असे कळविले आहे. पालिकेचा मालमत्ता विभाग मात्र याकडे कानाडोळा करीत आहे.