‘द्रौपदी विहार’च्या मालकाविरोधात गुन्हा
पश्चिमेतील ‘द्रौपदी विहार’ या ३० वर्षे जुन्या इमारतीची भिंत पाडून इमारतीला धोका निर्माण केल्याप्रकरणी मालक अभिमन्यू जोशी यांच्याविरोधात महापालिकेने विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या इमारतीतील २३ कुटुंबीयांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे, असा दावा पालिकेचे ‘ह’ प्रभाग क्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत यांनी केला. अशा प्रकारे महापालिकेने इमारत मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची पहिलीच वेळ आहे.
पश्चिमेतील देवी चौकातील द्रौपदी विहार या वसाहतीमधील इमारत धोकादायक झाल्याने २ जून रोजी रिकामी करण्यात आली. इमारत अचानक धोकादायक ठरविल्याने रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे, तसेच घरे रिकामी करावी लागल्याने रहिवासी आक्रमकही झाले होते. मात्र, कोणतीही जिवीतहानी होऊ नये यासाठी महापालिकेने तातडीने इमारत रिकामी करण्याचा निर्णय घेतला.
याच इमारतीत ‘मॉडर्न इंग्लिश स्कूल’ नावाची शाळाही भरते. महापालिकेने इमारतीचे संरचनात्मक सव्‍‌र्हेक्षण केले. याद्वारे प्राप्त झालेल्या अहवालानुसार इमारत मालकाने पाठीमागील भिंत फुगल्याने पाडल्याचे स्पष्ट झाले. यामुळे इमारतीचे खांब कलले व इमारत धोकादायक झाली,असा निष्कर्ष या अहवालातून पुढे आला. इमारत मालकाच्या या कृत्याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून विष्णुनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धोकादायक इमारत ठरविताना मूळ रचनेत बदल करण्यात आले आहेत का, तसेच हे बदल नेमके कधी आणि कोणी केले याचा तपासही करणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.