रुंदीकरण करताना कल्याण-डोंबिवली पालिकेचा दुजाभाव

विकास आराखडय़ात प्रस्तावित मापाप्रमाणे रस्त्यांचे रुंदीकरण होत असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगितले जात असले तरी डोंबिवली पश्चिम विभागातील कारवाई त्याला अपवाद ठरत असल्याच्या तक्रारी येत आहेत. डोंबिवली पश्चिमेतील श्रीधर म्हात्रे चौक ते मारुती मंदिर (सुभाष पोहच रस्ता) रस्त्याचे रुंदीकरण करताना या रस्त्यामधील चाळी जमीनदोस्त केल्या. त्या जागी गटारे बांधण्यात आली. मात्र, या मार्गावरील दोन बंगले वाचवण्यासाठी पालिकेतील काही अधिकाऱ्यांनी या ठिकाणी रुंदीकरणानंतरची रस्तारेषा दोन मीटरने आत घेण्याचा प्रयत्न सुरू आहेत.

बुधवारी सकाळी पालिकेचे पथक बंगले तोडण्यासाठी गेले होते. त्या वेळी एका बंगलामालकाने फक्त समोरच्या भागावर कारवाई करण्याची मुभा दिली. उर्वरित बांधकाम मालकांकडून तोडू देण्यात येत नसल्याचे पालिका कर्मचाऱ्यांनी सांगितले. एक बंगला सुरक्षित राहत असल्याने, दुसरा बंगलामालक त्याचा फायदा घेत आहे, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. श्रीधर म्हात्रे चौक ते मारुती मंदिर रस्त्यावरची अतिक्रमणे तोडण्यासाठी पालिकेने दोन महिन्यांपूर्वी ज्या खुणा केल्या होत्या. त्या खुणांप्रमाणे पालिकेच्या ‘ह’ प्रभाग कर्मचाऱ्यांनी या रस्त्याला बाधित होणाऱ्या चाळी, गाळे तोडून टाकले. या रस्त्यामुळे दोन बंगले बाधित होत आहेत. ते वाचविण्यासाठी पालिकेतील काही अधिकारी प्रयत्नशील असल्याची चर्चा  आहे. हा रस्ता विकास आराखडय़ात १५ मीटर रुंदीचा आहे. त्याची रस्तारेषा निश्चित करण्यात आली आहे. असे असताना, सर्वसाधारण सभा, सर्वपक्षीय नगरसेवक, नगरविकास विभाग यांना अंधारात ठेवून प्रशासनाने परस्पर रस्तारेषा बदललीच कशी, असे प्रश्न या भागातील  रहिवाशी विचारत आहेत.

बाधितांच्या नोटिसांमध्ये नाव

‘ह’ प्रभागातील कर्मचाऱ्यांनी १५ मीटर रस्त्याप्रमाणे श्रीधर म्हात्रे चौक ते मारुती मंदिर रस्त्याची रस्तारेषा निश्चित करून तेथील चाळी, बंगल्यातील रहिवाशांना  नोटिसा बजावल्या होत्या. बाधितांच्या यादीमध्ये चाळकऱ्यांसह बंगलेमालकांची नावे आहेत. त्यांनी चाळीतील रहिवाशांप्रमाणे आपले बंगले खाली करून रस्त्यासाठी जागा खाली करणे आवश्यक होते. मात्र तसे झालेले नाही. प्रशासनाने बांधकामे तोडण्याची विहित प्रक्रिया पूर्ण करून दीड महिन्यांपूर्वी या रस्त्याला बाधित सर्व चाळी, गाळे तोडून टाकले. तसेच या ठिकाणी गटाराचे बांधकामही केले. परंतु, त्या  बंगल्यांवर कारवाई झाली नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

श्रीधर म्हात्रे चौक ते मारुती मंदिरादरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण विकास आराखडय़ातील रस्तारेषेप्रमाणे करण्यात येत आहे. या रस्त्यात दोन बंगले आहेत. यामधील एक बंगला तर तोडण्यात आला आहे, अशी माहिती आहे. रस्तारेषा अजिबात बदलण्यात आलेली नाही. आणि ती बदलली जाणार नाही.

– सुरेंद्र टेंगळे, नगररचनाकार, कडोंमपा