येत्या सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचा विचार करून सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीने विकास कामांची खैरात करणारा अर्थसंकल्प तयार केला आहे. महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना विकास कामांचा गडगडाट काय कामाचा, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षांकडून उमटू लागली आहे. सरत्या आर्थिक वर्षांत ५९० कोटींचे महसुली उत्पन्न अपेक्षित असताना प्रत्यक्षात ३७१ कोटींची वसुली प्रशासनाने केली आहे. २२९ कोटींचा महसुली उत्पन्नात निव्वळ तोटा झाला आहे. उपलब्ध महसूल व मागील वर्षभरातील १८८ कोटींची वित्तीय तूट विचारात घेता विकास कामांसाठी चालू वर्षांत मुबलक निधी उपलब्ध होणार नसल्याचे अर्थसंकल्पातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
दोन महिन्यांपूर्वी महापालिकेचे मुख्य लेखा अधिकारी दा. सु. चव्हाण यांनी आयुक्तांना दिलेल्या अहवालात उत्पन्नाचा इष्टांक वाढवून दिल्याखेरीज विकासकामांसाठी निधी उपलब्ध होणार नाही, अशी भीती व्यक्त केली होती. सरत्या वर्षांत ३५ कोटी आणि आगामी वर्षांसाठी ६५ कोटींचे इष्टांक वाढवले तर शिलकी अंदाजपत्रक सादर करता येईल, असेही त्यांनी म्हटले होते.
त्यामुळे अर्थसंकल्पात आकडे फुगवण्याची मागील परंपरा अधिकाऱ्यांनी यंदाही सुरू ठेवली असल्याचे दिसून आले आहे.

कडुनिंब पचवा
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर विकासाचा भूलभुलय्या सत्ताधारी युतीकडून उभा करण्यात आल्याची टीका होत आहे. अनेक नगरसेवकांच्या प्रभागात मजूर संस्थांच्या माध्यमातून कामे सुरू आहेत. या कामांची देयके ३१ मार्चपूर्वी काढणे आवश्यक असल्याने काही नगरसेवक सुधारित अंदाजपत्रकाला चर्चेविना मंजुरी देण्याची मागणी करीत होते. पालिका पदाधिकाऱ्यांचे तुळशीचे रोप देऊन स्वागत करणारे स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी हिरवेगार तुळशी रोप महापौरांना दिले असले तरी, अन्य नगरसेवकांना त्यांनी अंदाजपत्रकात तुळशीपत्र दिले आहे, अशी टीका काँग्रेस नगरसेवक सचिन पोटे यांनी करून नगरसेवकांना विकास कामांसाठी तुटपुंजा निधी दिला असल्याचे सांगितले. दरम्यान, अंदाजपत्रकातील तरतुदी व प्रभागातील कामे करताना कोणालाही आर्थिक अडचण येणार नाही. अंदाजपत्रकात विकास कामांसाठी तरतुदी नाहीत असे काही नगरसेवकांना वाटत असेल तर तो अन्याय दूर करण्यासाठी आपण आहोत. कोणाही नगरसेवकावर अन्याय होणार नाही. यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे, असे महापौर कल्याणी पाटील यांनी सांगितले.

विकासाची स्वागत यात्रा
* नव्याने विकसित होणाऱ्या भागात ३३ कोटींचे नवीन रस्ते
* सिमेंट रस्ते आगामी वर्षांत पूर्ण करणार
* एकूण रस्ते कामांसाठी २५७ कोटी
* कल्याण पूर्व भागासाठी ६ एमएलडीचा जलकुंभ बांधणार
* वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नियंत्रकासाठी दीड कोटी

* गल्लीबोळातील सफाईसाठी यांत्रिक झाडू
* पु. भा. भावे सभागृह नूतनीकरण १ कोटी
* नवजात बालकांसाठी इनक्युबेटरच्या व्यवस्थेसाठी ७० लाख
* वडवली, ठाकुर्ली, नांदिवली पुलांसाठी ११ कोटींची तरतूद
* कल्याणमधील शेणाळे व इतर तलाव दुरुस्तीसाठी ५ कोटी
* डोंबिवलीत व नेतिवली येथील जॉगिंग ट्रॅकसाठी एक कोटी
* पुतळ्यांच्या उभारणीसाठी १० कोटी

विभागांचे लक्ष्य
* मालमत्ता कर २७२ कोटी  ’एलबीटी २७७ कोटी
* विशेष अधिनियम ९७ कोटी  ’पाणीपट्टी ६० कोटी
* मालमत्ता व सेवा ३८ कोटी

* २०१४-१५ या सरत्या आर्थिक वर्षांसाठी ११६४ कोटी ७४ लाख जमेचा आणि १०२० कोटी ४ लाख खर्चाचा, तसेच १४४ कोटी शिलकीचा सुधारित अर्थसंकल्प
* २०१५-१६ या वर्षांसाठीचा १४०९ कोटी ८७ लाख जमेचा आणि १४०९ कोटी ७१ लाख खर्चाचा अर्थसंकल्प
* चालू आर्थिक वर्षांचे मूळ अंदाजपत्रक १५९९ कोटी.
*  ११६४ कोटी रुपयांचे सुधारित अंदाजपत्रक
* ४३४ कोटी रुपयांनी अंदाजपत्रक फुगवले