वसईतील अपहृत महिला पंजाबमध्ये मित्रासोबत;१३ दिवसांनंतर पोलिसांकडून ताब्यात
वसईतील शिल्पी वर्मा या महिलेचे नाटय़मयरीत्या झालेले अपहरण हा एक बनाव असल्याचे उघडकीस आले आहे. ज्या तरुणाने तिचे अपहरण केले, त्याच्यासोबतच ती पंजाबमध्ये पळून गेली होती. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले असून अपहरणाचा बनाव का रचला, या प्रकरणात कोण कोण सहभागी आहे याचा तपास केला जाणार आहे. गेल्या १३ दिवसांपासून या महिलेने पोलिसांची झोप उडवली होती.
शिल्पी वर्मा ही विरार येथे राहते. २ फेब्रुवारी रोजी ती आपली मैत्रीण नूपुरकुमारी श्रीवास्तव हिच्या सोबत गाडीने घरी जात होती. नूपुरकुमारी हिने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार संध्याकाळी सहाच्या सुमारास विरारच्या ग्लोबल सिटी येथे त्यांची गाडीने एक तरुणाला धडक दिली. त्या तरुणाने मग गाडीत प्रवेश करून दोघींना चाकूच्या धाकाने धमकावले आणि दीड तास शहरात फि रवले. त्यानंतर गाडीचा टायर फाटल्याने त्याने दोघींना गाडीतून खाली उतरवले आणि शिल्पी वर्मा यांना जबरदस्तीने रिक्षात बसवून पळवून नेले. दिवसाढवळ्या एका महिलेचे अपहरण झाल्याने खळबळ उडाली होती.
पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसह ५० पोलिसांचे वेगवेगळे पथक या प्रकरणाचा तपास करीत होते. दरम्यान, ही महिला पंजाब येथे आपल्या मित्रासह सापडली आहे. त्यानेच हे कथित अपहरण घडवून आणल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र खरे कारण वसईत आणून त्यांची चौकशी केल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
पोलिसांनी पूर्वीपासूनच या प्रकरणाच बनाव असल्याचा संशय येत होता. पळवून नेल्याचे बघणारा एकही साक्षीदार पोलिसांना सापडलेला नव्हता. कुठल्याही सीसीटीव्हीमध्ये पोलिसांनी तो अपहरणकर्ता दिसलेला नव्हता. २०१३ मध्येही कानपूर रेल्वेतून येताना या महिलेचे कथित अपहरण झाले होते. चार दिवसांनी ती तिच्या मित्रासोबत सापडलेली होती.

आम्ही या महिलेला तिच्या मित्रासमवेत पंजाब येथे ताब्यात घेतले आहे. बुधवार संध्याकाळपर्यंत त्यांना वसईला आणले जाईल. त्यांच्या अधिक चौकशीत नेमके सत्य बाहेर येईल.
– श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक

नूपुरकुमारी श्रीवास्तव या महिलेने अपहरणाची फिर्याद दिली होती. तिचा या प्रकरणात सहभाग आहे की नाही ते तपासले जाईल. पोलिसांची दिशाभूल करून हा बनाव रचल्याचे उघड झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.
– अशोक होनमाने, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक