News Flash

कोंडेश्वर निसर्गाचे वरदान!

निसर्गाच्या कुशीत वसलेल्या बदलापूरला कोंडेश्वर धबधब्याच्या रूपाने एक वरदानच मिळाले आहे. धकाधकीच्या आयुष्यात पावसाळय़ात निवांत क्षण शोधायचे असेल तर पर्यटकांनी आवर्जून भेट द्यावी आणि पावसाळी

| August 20, 2015 03:42 am

सहजसफर
निसर्गाच्या कुशीत वसलेल्या बदलापूरला कोंडेश्वर धबधब्याच्या रूपाने एक वरदानच मिळाले आहे. धकाधकीच्या आयुष्यात पावसाळय़ात निवांत क्षण शोधायचे असेल तर पर्यटकांनी आवर्जून भेट द्यावी आणि पावसाळी सहलीचा आनंद लुटावा असे स्थळ म्हणजे कोंडेश्वर. हिरवेगार डोंगर, त्यावर धुक्याची दुलई, गर्द हिरवाई, धो धो कोसळणारा धबधबा, त्यामुळे तयार झालेले तळे आणि तळय़ाकाठी महादेवाचे मंदिर.. कोंडेश्वरचा परिसर म्हणजे जणू स्वर्गच.
बदलापूर स्थानकापासून १० ते १२ किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कुशीत कोंडेश्वर वसलेले आहे. मलंगगड आणि परिसरातील डोंगरातून धबधबे फुटतात आणि ते पाहताना एखादे निसर्गचित्रच पाहतो आहे काय, असे आपल्याला वाटते. येथे ‘कोंडेश्वर’नामक शिवशंकराचे मंदिर आहे, त्यामुळेच या परिसराला कोंडेश्वर नाव पडले. या मंदिराच्या बाजूलाच धबधबा असून या धबधब्याखाली पर्यटक भिजण्याचा मनमुराद आनंद घेतात. तब्बल १५ फूट उंचावरून पडणारा हा धबधबा निसर्गाचे अद्भुत वरदान आहेच, मात्र तितकाच धोकादायक आहे. या धबधब्याच्या पाण्यामुळे तयार झालेल्या तळय़ात काही ठिकाणी खडकही आहेत, तर काही ठिकाणी ते खोल आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेताना विशेष काळजी घेतली पाहिजे.
धबधब्याखाली न जाता जिथे पाणी जास्त खोल नाही अशा ठिकाणी डुंबण्याचा आनंद पर्यटकांनी घेतला पाहिजे. या तळय़ात एक बांध बांधण्यात आला असून, या बांधामुळे या परिसराच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. बांधाच्या एका बाजूने पाण्याचा होणारा खळखळ आवाज मन प्रसन्न करतो. बांधाच्या एका बाजूस अधिक खोलगट भाग नसल्याने पर्यटकांनी तिथे चिंब होण्याचा आनंद घ्यावा. या तळय़ाच्याच एका बाजूला गणपतीचे लहानसे मंदिर आहे. मुसळधार पावसाने पाणी अधिक वाढल्यास या मंदिराच्या सभोवती पाणी साचते. बरेच पर्यटक पोहत जाऊनच या गणेशाचे दर्शन घेतात. या परिसरातील ही दोन्ही मंदिरेही पाहण्यासारखी आहेत. एकूणच निसर्गसौंदर्याने नटलेला हा परिसर म्हणजे धरतीवर अवतरलेला स्वर्गच आहे, त्यामुळेच सुटीच्या दिवशी येथे पर्यटकांची खूप गर्दी होते.

कसे जाल?कोंडेश्वर, बदलापूर
’बदलापूर स्थानकातून कोंडेश्वरला जाण्यासाठी ऑटोरिक्षा किंवा सहाआसनी रिक्षा मिळतात. मात्र रिक्षाचे भाडे अगोदरच ठरवून घ्यावे.
’खासगी गाडीने जाणार असाल तर कर्जत-बदलापूर रस्त्यावर खरवई गाव आहे, तेथून कोंडेश्वरला जाण्यासाठी फाटा फुटतो.

काळजी घेणे गरजेचे!
कोंडेश्वर पर्यटनस्थळ सहलीसाठी जेवढे चांगले, तितकेच धोकादायकही आहे. धबधब्याच्या पडणाऱ्या पाण्यामुळे येथील तळय़ात खळगे तयार झाले आहेत, पाण्यात चिंब होण्याचा आनंद घेताना या खळग्यांचा अंदाज नसतो. त्यामुळे येथे काळजी घेतलेली बरी. पाण्यात काही ठिकाणी खडकही आहेत. त्यामुळे पाय घसरून अपघात होण्याचीही शक्यता आहे. अंदाजे १५ फुटांवरून कोसळणारा हा धबधबा छातीत धडकी भरवितो. त्यामुळे धबधब्याखाली जास्त वेळ न राहिलेले बरे. तसेच काही पर्यटक थेट उंचावरून धबधब्याखाली पाण्यात उडी मारतात, त्यामुळे अपघात होऊन प्राणास मुकण्याची शक्यताच अधिक आहे. काही पर्यटक मद्यप्राशन करून येथील निसर्गाला बाधा आणतात, तसेच काही जण मौजमस्तीच्या नावाखाली निसर्गाची हानी करतात, अशा पर्यटकांवर चाप आणला पाहिजे. या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने फलक लावण्यात आलेले आहेत, त्या सूचनांचे पालन पर्यटकांकडून होणे आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2015 3:42 am

Web Title: kondeswhar water fall
Next Stories
1 पावसाळ्यातील भाजीपाला
2 समूहचित्राकडून सेल्फीकडे..!
3 बुद्धिबळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
Just Now!
X