ऑगस्टअखेपर्यंत पूल वाहतुकीसाठी खुला; वीजवाहिन्यांच्या स्थलांतरासाठी पालिकेचा रेल्वे अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा

डोंबिवली : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कोपर उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूच्या पोहोच रस्त्यांची कामे अंतिम टप्प्यात असून ऑगस्ट महिनाअखेपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन पालिकेकडून केले जात आहे. या पुलावरून पूर्वेकडून पश्चिमेकडे महावितरणच्या दोन उच्च दाबाच्या वीजवाहिन्या गेल्या असून त्या स्थलांतराचे काम रेल्वेने तातडीने पूर्ण करावे यासाठी पालिकेकडून रेल्वे अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती बांधकाम विभागातील एका अधिकाऱ्याने दिली.

धोकादायक झाल्यामुळे कोपर उड्डाणपूल मागील दोन वर्षांपासून वाहतुकीसाठी बंद आहे. डोंबिवलीतील मध्यवर्ती ठिकाणचा पूल बंद असल्याने वाहनचालकांना वळसा घालून ठाकुर्ली पूलमार्गे पश्चिमेत जावे लागते आहे. या प्रवासामुळे नागरिक आणि वाहनचालक हैराण झाले आहेत. त्यामुळे पूल लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी त्यांच्याकडून होत आहे. आतापर्यंत पाच ते सहा वेळा पूल सुरू करण्याची आश्वासने लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. परंतु करोना प्रादुर्भावामुळे लागू केलेली कठोर टाळेबंदी, गावी गेलेले मजूर यांमुळे पुलाचे काम रखडले होते. त्यामुळे पूल वाहतुकीसाठी खुला होण्यासंदर्भात वेळोवेळी दिलेली आश्वासने पूर्ण करता आली नाहीत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

पुलावरील २१ तुळया, दोन्ही बाजूच्या पोहोच रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. महावितरणच्या दोन उच्च दाबाच्या वीजवाहिन्या रेल्वेने स्थलांतरित करण्याचे काम तसेच पुलाची किरकोळ कामे शिल्लक आहेत. ही कामे लवकरच पूर्ण करून ऑगस्टअखेपर्यंत पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर शहरातील वाहतुकीचे विभाजन होऊन वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल.