ठाण्यात कोव्हॅक्सिन लशीचा तुटवडा

ठाणे : महापालिका क्षेत्रामध्ये लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण केंदे्र बंद ठेवावी लागत असतानाच, आता गेल्या काही दिवसांपासून शहरात कोव्हॅक्सिन लसीचा साठा उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. कोव्हॅक्सिनची पहिली मात्रा घेणाऱ्या अनेकांची दुसऱ्या मात्रेची मुदतही संपत आली असून तरीही दुसरी मात्रा मिळत नसल्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये ५५ हून अधिक करोना प्रतिबंधक लसीकरण केंदे आहेत. या ठिकाणी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस नागरिकांना दिली जाते. काही दिवसांपूर्वी कोव्हिशिल्ड लसीचा तुटवडा निर्माण झाला होता. मात्र, त्यावेळेस कोव्हॅक्सिन लसीचा साठा उपलब्ध असल्यामुळे ती लस नागरिकांना दिली जात होती. याउलट परिस्थिती निर्माण झाली असून पालिकेकडे केवळ कोव्हिशिल्डचा साठा उपलब्ध आहे. तोही पुरेसा नसल्यामुळे शहरात केवळ एकच केंद्र सुरू आहे, तर कोव्हॅक्सिनचा साठाच उपलब्ध नसल्यामुळे दुसरी मात्रा देणे बंद आहे. पहिली मात्रा घेतल्यानंतर दुसरी मात्रा घेण्यासाठी विहित कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. परंतु कोव्हॅक्सिनची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांचा दुसरी मात्रा घेण्याचा कालावधी संपत आला तरी, त्यांना लस मिळत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून यातून महापालिकेकडे याबाबत विचारणा करू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून कोव्हॅक्सिन लशीचा साठा आवश्यकेनुसार उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. १८ ते ४४ या वयोगटातील सर्व नागरिकांना कोव्हॅक्सिनचीच मात्र देण्यात येणार असल्याचे समजते. परंतु मागील दोन-चार दिवसांच्या कालावधीमध्ये या नागरिकांना कोव्हिशिल्डची मात्रा देण्यात आली आहे. आगामी काळात केवळ १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांना कोव्हॅक्सिनची मात्रा देणे निश्चित केले तर, इतर ४५ वर्षे व त्यापुढील वयोगटातील नागरिकांना कोव्हॅक्सिनची दुसरी मात्रा उपलब्ध होणार नाही. त्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता आहे. तसेच १८ ते ४४ या वयोगटासाठी निश्चित केलेल्या लसीकरण केंद्रावर ज्यांना कोव्हॅक्सिनची दुसरी मात्रा मिळाली नाही, असे नागरिकही गर्दी करतील. तसेच या केंद्रावर ४५ वर्षे व त्या पुढील नागरिकांना लशीची मात्रा देण्यास मनाई केल्यामुळे लसीकरण मोहीम राबविणे गैरसोयीचे होणार आहे, असेही म्हस्के यांनी म्हटले आहे.

दुसऱ्या मात्रेची प्रतीक्षा

ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत २३ हजार २२२ नागरिकांना कोव्हॅक्सिनची पहिली मात्रा देण्यात आला असून यापैकी केवळ ५,४९८ नागरिकांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. उर्वरित १७ हजार ७२४ नागरिकांना दुसरी मात्रा मिळालेली नाही.