तलाव कोरडाठाक पडल्याने भाजी लागवडीच्या हंगामावर परिणाम
अंबरनाथ तालुक्यातील कुंभार्ली गावाजवळील तलावातील पाणीसाठा यंदा पहिल्यांदाच आटला आहे. त्यामुळे तलावातील पाण्यावर वर्षांनुवर्षे भाजी लागवडीचा व्यवसाय करणाऱ्या या भागातील शेतक ऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. शिवमंदिराच्या काठी असलेला हा पांडवकालीन तलाव कुंभार्ली गावासाठी महत्त्वाचा मानला जातो. बाराही महिने या तलावाला पाणी असते. त्यामुळे शेतीसोबत नियमित पाणी वापराबरोबर गाईगुरांसाठी हे पाणी वापरले जात होते. अनेक वर्षांनंतर तलाव पहिल्यांदाच कोरडाठाक पडल्याने ग्रामस्थ चिंतातूर झाले आहेत.
कुंभार्ली गावात शेकडो वर्षांपूर्वीचे शिवमंदिर व पांडवकालीन तलाव आहे. आखीव- रेखीव पद्धतीने तलावाची बांधणी करण्यात आली असल्याने तलावातील पाण्याचा एक थेंबही फुकट जात नाही, असा ग्रामस्थांचा दावा असतो. पावसाळ्यात तलाव दुथडी भरून वाहतो. तर उर्वरित आठ महिनेही तलावात मुबलक पाणीसाठा असतो. कितीही कडक उन्हाळा असला तरी तलाव आटल्याचे कधी कोणा गावक ऱ्याने पाहिलेले नाही. गेल्या काही वर्षांत भूगर्भात होत असलेले बदल, आटत चाललेली भूजल पातळी त्यामुळे गोमुखातून वाहणारे पाणी यंदा बंद झाले आहे, असे ग्रामस्थ समीर भंडारी यांनी सांगितले.
तलावात बाराही महिने पाणी असल्याने गावातील कूपनलिका, विहिरींना मुबलक पाणीसाठा असायचा. तलावाच्या पाण्यावर वर्षांनुर्वष कुंभार्ली गावातील ग्रामस्थ, शेतकरी भाजीपाल्याची लागवड करायचे. दिवाळी झाली, भात कापणीचा हंगाम संपला की शेतकरी भाजीपाला लागवडीच्या मागे लागायचे. तलावाच्या अवतीभोवतीचे शेत, वरकस जमिनीवर भाजीपाला लागवड करण्यात येत होती. या लागवडीमध्ये घोसाळी, कारली, वांगी, टोमॅटो, भेंडी, शेवग्याच्या शेंगा, दुधी भोपळा, पालक, मेथी, कोथिंबीरचा समावेश असायचा. फार मोठी भांडवली गुंतवणूक न करता कष्ट, मेहनत करून साठ कुटुंबे तलावाच्या पाण्यावर चार ते पाच महिने भाजीपाला लागवड करीत. त्यामुळे वर्षांचे आर्थिक गणित, दैनंदिन खर्च या लागवडीत निघून जायाचा. नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात केलेल्या लागवडीतून शेतकरी मेअखेपर्यंत भाजीपाल्यातून उत्पन्न घेत असत. कल्याणच्या बाजारात हा सगळा ताजा भाजीपाला शेतकरी विकतात. या उत्पन्नातून कुटुंब, मुलांच्या शिक्षणासाठी दोन पैसे मिळत होते. यावेळी प्रथमच तलावातील पाण्याने दगा दिल्याने शेतक ऱ्यांची कोंडी झाली आहे, असे ग्रामस्थ रामदास म्हात्रे यांनी सांगितले. तलाव सुस्थितीत राहावा म्हणून त्याची डागडुजी करण्यात आली होती. तलावातील पाणी आटल्याने मोकाट गाईगुरांचे हाल होत आहेत.

तलावातील पाण्याचा गावकऱ्यांना मोठा आधार होता. पाणीसाठा आटेल असे कधी वाटले नव्हते. गेल्या वर्षी कमी झालेला पाऊस, वाढते उष्णतामान आणि पाण्याचे वेगाने होत असलेले बाष्पिभवन या सगळ्या निसर्गचक्राचा तलावातील पाण्याला फटका बसला. तलावातील पाण्यात गायमुखातून सतत झरा चालू असायचा. तोही बंद झाला आहे. तलाव म्हणजे गावातील काही शेतक ऱ्यांचे रोजगाराचे साधन होते. चार महिने तलावाच्या पाण्यावर भाजीपाला लागवड करून दोन पैसे गाठीशी लागायचे. ते यावेळी बंद झाले आहे.
– तुळशीराम पाटील, शेतकरी, कुंभार्ली.
तलावाच्या पाण्यातून भाजीपाला लागवड होत होती. त्यामुळे अनेक कुटुंबांच्या हातांना काम मिळाले होते. घरबसल्या मेहनत करून दोन पैसे कमविण्याची संधी होती. ती यावेळी तलावातील पाणी आटल्याने बंद झाली आहे. शासनाने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तलावातील गाळ काढण्यासाठी सहकार्य करावे.
– नाथा ठाकरे, शेतकरी, कुंभार्ली.