वनाधिकाऱ्यांकडून विविध तपासण्या सुरू

उल्हासनगर शहरात रविवारी अचानक आणि पहिल्यांदाच आलेल्या बिबटय़ामुळे एकच खळबळ उडाली होती. बिबटय़ाला काही तासांतच जेरबंद करण्यात आले. मात्र त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. सध्या या बिबटय़ाला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून त्याची विविध प्रकारच्या तपासण्या केल्या जाणार असल्याचे कळते. मात्र हा बिबटय़ा उल्हासनगरात आलाच कसा, याचे गूढ अद्यापही कायम आहे.

गुढीपाडव्याची सकाळ उल्हासनगरवासीयांसाठी खळबळ माजवणारी ठरली. अतिशय दाटीवाटीच्या आणि वर्दळीच्या उल्हासनगर शहरात बिबटय़ाने प्रवेश केला होता. वन विभागाच्या पथकाने काही तासांतच या बिबटय़ाला जेरबंद केले. मात्र हा बिबटय़ा उल्हासनगरात आलाच कसा असा सवाल आता उपस्थित होत आहे. उल्हासनगर शहरापासून जवळपास १५ किलोमीटरवर मलंगगडाचा डोंगर आहे तर शेजारीच टावळीचा डोंगर आहे. या भागात काही महिन्यांपूर्वी बिबटय़ाचे ठसे सापडले होते. त्यामुळे याभागात बिबटय़ाचा वावर असल्याचे समोर आले होते.

बदलापूरजवळील कासगावचा डोंगर असो वा पुढे भीमाशंकरचे अभयारण्य यातही बिबटय़ाचे पुरावे सापडले होते. मात्र या सर्व ठिकाणाहून उल्हासनगपर्यंतच्या या पट्टय़ात मोठय़ा प्रमाणावर नागरी वस्ती, महामार्ग असल्याने बिबटय़ा ते पार करून कसा आला असेल, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. बिबटे अनेकदा अन्नाच्या शोधात किंवा आपल्या हद्दीच्या शोधात फिरत असतात. अनेकदा आपल्या हद्दीच्या वादातून जखमी बिबटे मिळेल तो मार्ग शोधत असतात. शहरात त्यांना विनासायास शिकार मिळते. त्यामुळे ते शहराची वाट धरतात.

‘तो चुकून आलेला नव्हता’

‘रेस्क्वीन्सअसोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर’च्या पवन शर्मा यांना विचारले असता, राज्यभरात जेव्हा बिबटय़ांना वाचवले जाते, त्या वेळी त्यांच्या शरीरावर एक मायक्रोचिप लावली जाते. त्यातून त्यांचा प्रवास आणि इतर गोष्टी समोर येत असतात. त्यामुळे सध्या पकडलेल्या बिबटय़ाची त्या दृष्टीने तपासणी सुरू असून त्याच्या शरीरावरील ठिपक्यांच्या साहाय्यानेही त्याची माहिती मिळू शकते, असे त्यांनी सांगितले. सध्याच्या बिबटय़ाचे वय ५ वर्षे असून तो चुकून येण्याची शक्यता कमी आहे, असेही शर्मा यांनी सांगितले आहे. लवकरच तो राज्य शासनाच्या वन विभागाच्या दस्तऐवजातील बिबटय़ा आहे का हेही स्पष्ट होणार आहे. याबाबत वन अधिकारी जितेंद्र रामगावकर यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ  शकला नाही.