अंबरनाथमध्ये १३ तर बदलापुरात ६ टन क्षमतेच्या टाक्या उभारणार

अंबरनाथ : गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथ आणि बदलापूर शहरात प्राणवायूचा तुटवडा निर्माण होण्याच्या घटना वाढल्या आहेत. पुरवठ्यामधील मर्यादांमुळे प्राणवायूचा तुटवडा होत असला तरी प्राणवायू साठवण क्षमता नसल्याने प्राणवायूचा मोठा साठा आणण्यात अडचणी येत होत्या. या अडचणींवर मात करण्यासाठी अंबरनाथ आणि बदलापूर शहरांमध्ये आता मोठ्या प्राणवायूच्या मोठ्या टाक्या उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील पालिकेच्या कोविड रुग्णालयाच्या आवारात या टाक्या उभारल्या जाणार आहेत. अंबरनाथमध्ये १३ टन तर बदलापुरात ६ टन क्षमतेच्या टाक्या उभ्या केल्या जाणार आहेत.

अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये गेल्या काही दिवसांत करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. त्यामुळे शहरातील रुग्णालये पूर्ण क्षमतेने भरली आहेत. करोना रुग्णांना आधीच्या लाटेच्या तुलनेत सध्या प्राणवायूची आवश्यकता अधिक भासत आहे.बदलापूर आणि अंबरनाथ शहरात प्राणवायूचा तुटवडा जाणवत आहे. प्राणवायूचा साठा उपलब्ध करण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये प्राणवायूची मोठी साठवणक्षमता असलेल्या टाक्या बांधण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी नुकतेच दिले आहेत. त्यासाठी अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. अंबरनाथ शहरात पालिका संचालित दंत महाविद्यालयातील कोविड रुग्णालयात १३ टन क्षमतेची प्राणवायूची टाकी उभारली जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी दिली. बदलापूर शहरातील गौरी सभागृहातील रुग्णालयाच्या आवारात सहा टन क्षमतेची टाकी उभारली जाणार आहे. येत्या काही दिवसांत या टाक्यांच्या उभारणीचे काम पूर्ण केले जाणार असून या टाक्यांमुळे पालिकेची प्राणवायूसाठी होणारी धावपळ थांबण्याची चिन्हे आहेत, असे कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी सांगितले.

मोठा वाहतूक खर्च आणि मनुष्यबळ

सध्या ज्या ज्या ठिकाणाहून प्राणवायू उपलब्ध होतो त्या त्या ठिकाणांहून प्राणवायूच्या छोट्या क्षमतेच्या टाक्या आणल्या जातात. त्या संपताच त्या जागी दुसऱ्या टाक्या आणण्यासाठी धावपळ सुरू होते. या प्रक्रियेत मोठा वाहतूक खर्च आणि मनुष्यबळ लागते. यात वेळही मोठा खर्ची जातो. नव्या मोठ्या क्षमतेच्या टाक्या उभ्या केल्यास पालिकेचा वेळ, पैसा आणि मनुष्यबळ वाचणार आहे. अंबरनाथ शहरात चार दिवस पुरेल इतका, तर बदलापुरात पाच दिवस पुरेल इतका प्राणवायूचा साठा करणे शक्य होणार आहे.