28 February 2021

News Flash

बॅण्ड, बाजा आणि गरबा!

लाइव्ह बॅण्डमध्ये आठ ते दहा वादक, निवेदक आणि गायक कलावंतांचा ताफा असतो.

नवरात्रीसाठी ठाण्यात यंदाही ‘लाइव्ह बॅण्ड’ला पसंती; नऊ दिवसांसाठी लाखोंचा मोबदला

तरुणाईसह आबालवृद्धांनाही थिरकायला लावणाऱ्या नवरात्रोत्सवात डीजेच्या भिंती उभारून ध्वनिमुद्रित गाण्यांच्या तालावर गरब्याचा फेर धरण्याचे प्रकार वाढत असले तरी ठाण्यात यंदाही ‘लाइव्ह बॅण्ड’लाच आयोजक आणि गरबाप्रेमींची पसंती मिळत आहे. अस्सल गरब्याची धून वाजवणाऱ्या वाद्यवृंदांना यंदाही चांगली मागणी असून नऊ दिवसांत नामवंत वाद्यवृंदांची कमाई लाखांच्या घरात जाऊन पोहोचत असल्याचे दिसून येत आहे. त्याच वेळी अशा वाद्यवृंदासह ध्वनिक्षेपकावर वाजवणाऱ्या गाण्यांत यंदा ‘झिंगाट’, ‘काला चष्मा’, ‘बेबी को बेस..’ या गाण्यांवर दांडिया रंगण्याची शक्यता आहे.

नवरात्रोत्सवात ढोल, पियानो, गिटार, ढोलकी, बँजो अशा वाद्यांच्या सामूहिक सुरावटींवर सजलेल्या संगीतावर गरबा, दांडिया खेळला जातो. मात्र अलीकडच्या काळात अशा वाद्यवृंदासाठी लागणारी जागा, त्यातील वैविध्याचा अभाव आणि आर्थिक खर्च कमी करण्यासाठी डीजेचे ध्वनिवर्धक लावून रासगरबा खेळला जातो, परंतु ठाण्यात अजूनही ‘लाइव्ह बॅण्ड’ला पसंती दिली जात आहे. ‘लाइव्ह बॅण्ड’मध्ये ड्रम, पियानो, गिटार, ढोलकीसारख्या वाद्य वाजविण्याऱ्या कलाकारांसाठी नवरात्र म्हणजे ‘दिवाळी’ असते. कारण एरवी एक-दोन हजार रुपये मानधन मिळणाऱ्या वादकांना या काळात प्रतिदिन पाच हजार रुपये एवढी बिदागी मिळावी, अशी अपेक्षा असते. मात्र मंडप आणि सेलिब्रेटींसाठी लाखो रुपये मोजणारे आयोजक वादकांना मात्र पैसे देताना हात आखडते घेतात, अशी खंत परिणिताज् एव्हेंटचे दीपेश मोरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.

लाइव्ह बॅण्डमध्ये आठ ते दहा वादक, निवेदक आणि गायक कलावंतांचा ताफा असतो. त्यांच्या कलेनुसार त्यांना पैसे दिले जातात. मुंबईमधील काही नामांकित दांडियाच्या कलाकारांना प्रतिदिन दहा ते बारा हजार रुपये मिळतात. मात्र ठाण्यातील कलाकारांना दरदिवशी केवळ दोन ते तीन हजार रुपये एवढाच मोबदला दिला जातो. त्यातही टी.व्ही.वरील रिअ‍ॅलिटी शोमधून वारंवार दिसणाऱ्या वादकांना जरा बऱ्यापैकी भाव मिळतो. त्यांना चार ते पाच हजार रुपये दिले जातात. संपूर्ण नऊ दिवसांसाठी लाइव्ह बॅण्ड पाच ते सात लाख एवढे पैसे आकारतात.

ठाण्यातील आयोजकांचा ‘सैराट’ हट्ट

पालिका निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर ठाण्यात यंदा राजकीय पुढाऱ्यांचा वरदहस्त असणाऱ्या नवरात्रोत्सवात कार्यक्रमांची विशेष रेलचेल असणार आहे. काही राजकीय नेत्यांनी तर नवरात्रोत्सव दिमाखात होण्यासाठी इव्हेंट कंपन्यांची नेमणूक केली आहे. त्यासाठी लाखो रुपये मोजले आहेत. यंदा ठाण्यातील आयोजकांनी ‘सैराट’ चित्रपटाच्या कलाकारांना आणण्याचा हट्ट इव्हेंट कंपन्यांकडे धरला आहे. त्यासाठी आठ ते दहा लाख रुपये मोजण्याची तयारीही त्यांनी दर्शविली आहे. त्यामध्ये मुख्य कलाकारांना प्रत्येकी दोन लाख, तर सहकलाकरांना ५० हजार ते एक लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिनेमांच्या कलाकारांची नांदीही यंदा ठाण्यात दिसून येणार आहे. मात्र मेहनत करणाऱ्या वादक कलाकारांना त्यांच्या कामाचा मोबदला देताना तडजोड केली जाते, अशी खंत मोरे यांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2016 1:28 am

Web Title: live band in navratri
Next Stories
1 आयटीआय वसतिगृहाला असुविधांचे ग्रहण
2 कोसळलेल्या वडोल पुलावरून नागरिकांचा जीवघेणा प्रवास
3 काटेकोर पाणी मापनासाठी आता ‘स्मार्ट मीटर’
Just Now!
X