निषाद घाडी. वय वर्ष ११. अवाढव्य वाढत असलेल्या नालासोपारा शहराच्या गर्दीतील एक सामान्य घरातील एक मुलगा. एका अपघातात मरण पावला. साधा अपघातच तो. पण अपघातानंतर चार तास उपचार मिळण्यासाठी त्याला झगडावे लागले. उपचाराअभावी शहरातल्या गर्दीत घुसमटून जीव गमावणाऱ्या निषादने शिक्षण आणि वाहतूक व्यवस्थेपासून आरोग्य व्यवस्थेतील ढिसाळपणा, बेजबाबदारपणा उघडा केला आहेच, शिवाय धंदेवाईक वृत्तीवर, माणुसकीवर, संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. निषादचा मृत्यू प्रत्येक संवेदनशील व्यक्तीला हेलावून टाकणारा, चीड आणणारा आहे. निषादच्या अपघातानंतर जे घडले ते थरकाप उडवणारे आणि काळीज भेदरणारे होते. त्याचे वडील विविध रुग्णालयांत जखमी मुलाला कडेवर घेऊन उपचारांसाठी याचना करत फिरत होते. कुणी डॉक्टर देवपूजा करत होता, कुणा अत्याधुनिक रुग्णालयातील डॉक्टर बाहेर गेलेला होता. कुणी त्याला हात लावायला तयार नव्हता. पालिकेच्या सुसज्ज रुग्णालयात तर टाके मारून पुढील उपचार तुम्ही करा, असे सांगून परत पाठवले गेले होते. त्या बापाचा जीव तीळ तीळ तुटत होता. व्यवस्थेतील सर्वाच्या संवेदना बोधट झालेल्या होत्या, माणुसकी मेलेली होती. चार तास उपचार न मिळाल्याने सुरुवातीला पित्याला धीर देणाऱ्या निषादने तडफडत तडफडत प्राण सोडले. श्रीमंतीचे सोहळे मिरवणाऱ्या शहरात निषाद भूतकाळ बनतो.

निषादचा झालेला अपघात आणि नंतरच्या चार तासांत झालेल्या घटना सुन्न करणाऱ्या होत्या. विविध रुग्णालयांनी विविध कारणे देऊन त्याला परत पाठवले. पालिकेसह काही खासगी रुग्णालयांत सुविधांची वानवा होती. अतिदक्षता विभाग, सीटी स्कॅन आदी सुविधांच्या कमतरतेमुळे निषादला रुग्णालयात दाखल करून घेतले नाही. या सर्व प्रकारामुळे निषादचे वडील अगतिक झाले होते. निषादची तब्येत ढासळत चालली होती. विविध रुग्णालयांच्या फेऱ्या केल्यानंतर अखेर निषाद कोमात गेला आणि त्याने मृत्यूला कवटाळले.

निषादचा मृत्यू पोलिसांच्या लेखी एक अपमृत्यू. पोलिसांनी टँकरचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पण चार तास निषादला उपचार मिळाले नसल्याने संवेदनशीलतेचा बळी देणाऱ्या रुग्णालयांवर आणि डॉक्टरांवर का गुन्हे दाखल होऊ नयेत, असा प्रश्न विचारला जात आहे. महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत हा मुद्दा सर्वप्रथम उचलला गेला. नगरसेवक सुदेश चौधरी यांनी निष्काळजी आणि हलगर्जी दाखविणाऱ्या डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. महापालिकेची धावपळ सुरू झाली. पालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व डॉक्टरांकडे खुलासे मागवले. प्रशिक्षणासाठी मसुरीला गेलेले आयुक्त सतीश लोखंडे शहरात परतले आणि या प्रकाराने संतप्त झाले. महासभेतच या मुद्दय़ावरून सर्व सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला. पालिकेच्या रुग्णालयाने जखमी निषादला रुग्णावाहिका, परिचारिकेशिवाय परत कसे पाठवले याबद्दल आयुक्तांनी पालिकेच्या आरोग्य खात्याला खडसावले. या प्रकरणी कुणाचीही गय केली जाणार नाही, असे सांगत संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली.

निषादच्या मृत्यूनंतर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या सोयीसुविधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पालिका रुग्णालयाकडे सीटी स्कॅनसारखी यंत्रणा नसावी यासारखे दुर्दैव ते काय. याशिवाय पालिकेच्या रुग्णालयात अनेक अत्यावश्यक उपकरणे नसल्याचे समोर आले आहे. वसई-विरार महापालिकेची शहरात दोन रुग्णालये आहेत. त्यापैकी नालासोपारा येथे तुळिंज रुग्णालय आणि वसईत सर डीएम पेटिट हे रुग्णालय आहे. याशिवाय २१ आरोग्य केंद्रे असून दोन दवाखाने आहेत आणि दोन माता बालसंगोपन केंद्रे आहेत. परंतु या रुग्णालयात पुरेशी उपकरणे आणि सोयीसुविधा नाहीत. लहान बालके जन्मल्यानंतर त्यांना कृत्रिम श्वासोच्छ्श्वास यंत्रणा म्हणजेच व्हेंटिलेटरची आवश्यकता असते. परंतु लहान मुलांसाठी महापालिकेकडे केवळ दोनच व्हेंटिलेटर आहेत. वसईच्या डीएम पेटिट रुग्णालयातच केवळ दोन लहान मुलांचे व्हेंटिलेटर आहेत. त्यापैकी एक देणगी स्वरूपात मिळालेला आहे. या रुग्णालयात दररोज १० ते १२ बालके तर महिन्याला ३०० ते ३५० बालके जन्मतात. तुळिंज येथील रुग्णालयात हे प्रमाण जास्त असूनही तेथे एकही लहान मुलांचे व्हेंटिलेटर नाही. या तुळिंज रुग्णालयात दिवसाला सरासरी २० आणि महिन्याला सरासरी ६०० बालके जन्मतात. मात्र तेथे लहान मुलांचे व्हेंटिलेटर्स नाहीत. नोव्हेंबर महिन्यात व्हेंटिलेटर उपलब्ध न झाल्याने एका लहान बालकाचा मृत्यू झाला होता.

तुळिंज रुग्णालयात येणाऱ्या गर्भवती महिला या आर्थिक दुर्बल घटकातील असतात. जन्मणाऱ्या बालकांतील पाच टक्के बालके मुदतपूर्व जन्माला आलेली असतात, त्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यांच्यासाठी व्हेंटिलेटर आवश्यक असते. व्हेंटिलेटर नसल्याने बालकांना मुंबईच्या शासकीय रुग्णालयात किंवा वसईच्या खासगी रुग्णालयात दाखल करावे लागते. तेथे रुग्ण महिलांच्या कुटुंबीयांना मोठा आर्थिक फटका बसतो. पालिकेच्या रुग्णालयात पुरेशा सुविधा नसताना अनेक योजना कागदावरच आहेत. पालिकेने अत्याधुनिक सुविधा असलेले ट्रॉमा केअर सेंटर विरारच्या चंदनसार येथे बांधण्याचे ठरवले आहे. तिथे सीटी स्कॅनपासून सर्व यंत्रणा असणार आहे. मात्र हे केंद्र अद्याप कागदावरच आहे.

शाळेत मुलांनी वेळेवर यावे ही शिस्त आहे. पण त्यांना थेट घरी पाठवणे कितपत योग्य आहे. मुलांचे आईवडील कामावर जातात. मग अशा वेळी मुलांनी कुठे जावे. पालिका इतर कामांवर कोटय़वधी रुपये खर्च करते, पण सीटी स्कॅनसारखे उपकरण ठेवत नाही. खासगी रुग्णालयांनी २४ तास तज्ज्ञ डॉक्टर ठेवणे आवश्यक आहे. ते जर अशा सुविधा देत नसतील, तर मग त्यांना शहरात व्यवसाय करण्याचा काय अधिकार आहे? शहरात सार्वजनिक आणि खासगी कार्यक्रमात कोटय़वधींची उधळण होत असते. पण याच शहरात एका मुलाला उपचार मिळत नाहीत ही शोकांतिका आहे. निषाद हा संवेदना हरवलेल्या, बेपर्वा व्यवस्थेचा बळी आहे.

सुहास बिऱ्हाडे

@Suhas_news