|| जयेश शिरसाट

संघटित गुन्हेगारी टोळ्यांची नव्हती त्याहून कैक पटीने मुंबईकरांवर दहशत होती ती पाकीटमारांची. तुडुंब भरून वाहणाऱ्या बस आणि लोकल गाडय़ांमध्ये गर्दीत कोणाच्याही खिशात हात घालून पाकीट किंवा हाताला, गळय़ाला अलगद हिसका देऊन मौल्यवान अलंकार, घडय़ाळे लांबवणाऱ्या टोळीची तेव्हा मोठी दहशत होती. त्या वेळी पाकीटमारी हा सर्वात गंभीर गुन्हेगारीचा प्रकार होता. या गुन्हेगारीजगतात कुल्र्याच्या अलिदादा इस्टेटचा जबरदस्त दबदबा होता. इतका की, अलिदादा इस्टेटमधून मुंबईतल्या कुठल्याही पाकीटमाराला निरोप मिळाला की तो मारलेलं पाकीट घेऊन स्वत: परत करण्यासाठी तेथे येऊन धडकायचा.

अलिदादा इस्टेट

कुर्ला पूर्वेकडे रेल्वे स्थानकाला लागूनच अलीदादा इस्टेट उभी आहे. ६०च्या दशकात इथे फक्त ३० ते ३५ झोपडय़ा होत्या. आज तो आकडा काही हजारांवर पोहोचलाय. काही वस्त्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत बहुमजली बनल्या. एक मॉलही उभा राहिला. स्थानकापर्यंत येणारा मार्गही याच मिळकतीतला. ही मिळकत अली बिलाल सिद्धी यांची. परराज्यांमधून पोटापाण्यासाठी आलेल्या असंख्य मजुरांना अलीदादाने आपल्या मिळकतीत निवारा दिला तो कायमचाच. अनेकांना फुकट जागा दिली. ‘अलीदादा की एरिये में दहशत नहीं थी..उसने पुरी जिंदगी में किसी को लाफा भी नय मारा. ‘रिस्पेक्ट से’ हम लोग उसे दादा बुलाते थे. उसने जगा भी दी और खाने को रोटी भी..’ असं अलीदादाचं वर्णन आजही केलं जातं. मुंबईत धुमाकूळ घालणारे पाकीटमारही याच आदरापोटी  अलीदादाच्या दरबारात कबूल होत आणि पाकिटांमधून मारलेले पैसेही देऊ लागत.

मुळचे सोलापूरचे पण कुल्र्यात पडीक असलेले रसक्या, बंदेनवाज हे नामचीन पाकीटमार इतरांचे गुरू. या दोघांचं बोट पकडून तयार झालेले अभिमान, बाबू, ढांग्या, चंद्य, गौत्या, डॅनी हे मशहूर पाकीटमारही कुल्र्याचे नव्हते. पण कुर्ला हाच त्यांचा अड्डा. रेल्वे स्थानकांच्या पत्र्यावर झोपायचं आणि स्थानकालगतच्या खाडीत आंघोळ करायची. दिवसभर शहरातल्या बेस्ट बस, लोकलमधून खिसे कापत फिरायचं हाच त्यांचा धंदा. एके काळचा रेल्वेचं लोखंडसामान चोरणारा मोठा चोर मुनीर शेख ऊर्फ मुनीर भंगारही याच वस्तीतला. रेल्वेचे रूळच्या रूळ खांद्यावर लादून वस्तीत आणणं आणि पुढल्या काही मिनिटांत ते वितळवणं, थांबलेल्या रेल्वे गाडीचे ब्रेक काढणं, सिमेंट किंवा अन्य माल टनाटनाने चोरणं यात हातखंडा असलेला मुनीर उतारवयाकडे झुकलाय. त्याच्या इशाऱ्यावर रेल्वे यार्डामध्ये चोरी करणाऱ्यांमध्ये महिला आघाडीवर होत्या हे विशेष. त्यातल्या काही आजही वस्तीत आहेत. या सर्वाच्या वास्तव्यामुळे आणि त्यांच्या सततच्या राबत्यामुळे अलीदादा इस्टेट आणि आसपासच्या परिसराचा उल्लेख पोलीस अभिलेखावर पाकीटमार आणि चोरांची वस्ती असा पडला. इस्टेटीतली जुनी खोडं मात्र याचा स्पष्ट शब्दांत इन्कार करतात. पाकीटमार किंवा चोरांपैकी एकही या वस्तीत वास्तव्यास नव्हतं. मुळात त्यांना घरंच नव्हती. कुर्ला स्थानकात ही मंडळी पडीक असत, असं ते म्हणतात.

कुर्ला स्थानकाच्या आसपास खाडी, खाडीच्या पलीकडे असलेल्या रामकृष्णा आणि अनंता शेट्टी यांच्या गावठी दारूच्या भट्टय़ा, दारू ‘पासिंग’चा तो काळ पाहिलेल्यांनुसार त्या काळात विक्रोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुर्ला पूर्वेकडचा परिसर येत असे. कारवाईसाठी आत शिरलेल्या पोलिसांना गुल्लू मेंटल, मुनीर आणि त्यांचे साथीदार पकडून मेणबत्तीचे चटके देऊन बाहेर सोडत. त्यामुळे एकटय़ादुकटय़ा पोलिसाची इस्टेटीत एन्ट्री मारण्याची बिशाद नव्हती. वस्तीत पाकीटमार राहत नसले तरी त्या गुन्’ाासाठी पाच ते सहा जणांची टोळी आवश्यक होती. म्हणजे पाकीट मारणारा एक असे. त्याला पूर्वी मशीन किंवा पैदागीर असा सांकेतिक शब्द होते. सध्या ‘मोर’ हा शब्द प्रचलित झालाय. पाकीटमारीतून जे काही मिळेल त्यातला मोठा हिस्सा मशीन किंवा मोराला मिळे. टोळीतल्या उरलेल्यांचं काम एकच. हेरलेल्या सावजाच्या मागेपुढे उभं राहून त्याला हालचालही करणं शक्य होणार नाही अशी परिस्थिती निर्माण करायची. अशी परिस्थिती निर्माण झाली की मशीन किंवा मोर पाठल्या खिशात कोंबलेलं पाकीट, चोरखिशातले पैसे, शर्टाच्या वरच्या खिशात ठेवलेली रोकड, मनगटी घडय़ाळ, सुटकेस, कातडी बॅग अशी कापणार, उघडणार की आतलं सर्व सामान त्याच्या पिशवीत किंवा हातात पडणार. ते पडलं की मागच्या मागे हातोहात पसरवलं जाणार. सावज हुशार झालं की यांच्याच टोळीतला एक जण बस, लोकलमधून उतरून पळणार. त्याचा पाठलाग होणार. पकडल्यावर मी तर माझ्या आजारी आईसाठी धावतोय, तुम्ही का मला पकडलं, मी तर पुढे उभा होतो, घ्या झडती आणि करा खात्री, असे ठरलेले डायलॉग मारणार!

मनगटी घडय़ाळाला बैदा, वरच्या खिशातून पैसे चोरण्याच्या पद्धतीला छप्पर, गळय़ातल्या सोनसाखळीला रस्सी, चोर खिशातून पैसे मारल्यास आंटी, सावजाला धूर, शस्त्रक्रियेत उपयोग होणारं ब्लेड म्हणजे तास, त्याने कापलेला खिसा म्हणजे चिरा, बेस्ट बस म्हणजे छक्का, लोकल म्हणजे काई, पोलीस अधिकारी डॉक्टर, शिपायांना गंदा किंवा ठोला, जत्रा किंवा नैमित्तिक जमणाऱ्या गर्दीला फुटबॉल, बसमध्ये सावजाचा खिसा कापताना पोलीस चढला तर साथीदारांना सतर्क करून मागे हटण्यासाठी पानी या शब्दाचा उच्चार असे सांकेतिक शब्द, पाकीटमारी, चोरीच्या सुरस कथा या वस्तीत सांगितल्या जातात.

पूर्वीच्या काळात प्रत्यक्ष पाकीट मारणारे चोर मोजकेच होते. पण त्यांच्या साथीदारांची संख्या जास्त होती. हळूहळू हेच साथीदार पाकीटमार, चोर बनले. आणखी एक आठवण इस्टेटीत आवर्जून सांगितली जाते. दिवसभर पाकीटमारी करून हाती लागलेल्या पैशांमधून मंदिर किंवा दग्र्यात अन्नदान आवर्जून केलं जातं होतं.

आज पाकिटांमध्ये पैशांऐवजी कार्ड असतात. मोबाइलवरून परस्पर आर्थिक व्यवहार केले जातात. मौल्यवान वस्तू बेस्ट किंवा लोकलमधून नेल्या जात नाहीत. त्यांचा प्रवास खासगी वाहनांमधून होतो. त्यामुळे पाकीटमार आता पाकिटांऐवजी मोबाइल चोरीकडे वळले. चोरांच्या टोळ्या मोबाइलला ‘कव्वा’ म्हणतात. लोकल प्रवासात मोबाइल चोरीचं प्रमाण सर्वाधिक आढळतं. त्याखालोखाल मिरवणुका, जत्रा, सभा इथे मोबाइल चोरी होते. गणेशोत्सव काळ असो की रमजानचे रोजे देशभरातले चोर मुंबईत ठाण मांडतात. हसन उर्फ बीटी, छोटा अब्दुल, बडा अब्दुल, बडा पापा, छोटा पापा, लोकमान्य टिळक टर्मिनस येथील प्रकाश यादव, सलीम टोकन, शंकर भैया अशा अनेक मोबाइल चोरांच्या टोळय़ा मुंबईत सक्रिय असल्याची माहिती इस्टेटीतून मिळते. गरजेनुसार ती पोलिसांनाही पुरवली जाते. या टोळ्या पोलिसांना सांभाळूनच चोऱ्या करतात हे इथे छातीठोकपणे सांगितलं जातं. सध्या इस्टेटीतल्या झोपडपट्टीत झोपडपट्टी पुनर्वसन योजना सुरू आहेत. काही इमारती बांधून पूर्ण झाल्या, काहींची प्रक्रिया सुरू आहे. बहुतांश भागात मात्र बांधलेल्या आडव्यातिडव्या झोपडय़ाच जास्त आढळतात. पोटापाण्यासाठी परराज्यांमधून मुंबईत आलेला, हातावर पोट असलेला मजूरवर्ग मोठय़ा संख्येने वास्तव्यास आहे. मात्र वस्तीवरलं हे दूषण मात्र आजही कायम आहे.