वसई : पुरोगामित्वाचा दांभिक अतिरेक आणि धार्मिक, सांस्कृतिक प्रेरणांची दखलच न घेतली जाणे, हे समाजातील सध्याच्या धार्मिक उन्मादामागील महत्त्वाचे कारण आहे, असे निरीक्षण ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी नोंदवले. वसईतील प्रबोधन संस्थेतर्फे नंदाखाल येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या उपवासकालीन व्याख्यानमालेत कुबेर यांनी जागतिक घडामोडींचे संदर्भ देत सध्याचे वास्तव आणि भविष्यातील धोके यांवर भाष्य केले.

प्रबोधन संस्थेतर्फे ख्रिस्ती धर्मीयांच्या उपवासकाळात विविध विषयांवर व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते. या व्याख्यानमालेतील रविवारचे पुष्प दिवंगत रेव्हरंड फादर जॉन डिमेलो यांना समर्पित करण्यात आले. बसिन कॅथॉलिक बँकेचे अध्यक्ष ओनिल आल्मेडा यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ‘अंतरंग बदलत्या विश्वाचे’ या विषयावर बोलताना कुबेर यांनी दहशतवाद, जागतिक अर्थकारण, फोफावत चाललेला धर्मविचार आदी विषयांवर मते मांडली. ‘ज्याला आपण दहशतवाद म्हणतो, तो आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील आडपैदास आहे. डॉलरच्या जन्मामुळे जगातील विषमतेचा उद्रेक झाला. त्याला धर्माची जोड मिळाली.

बहुराष्ट्रीय कंपन्या विशिष्ट धर्मीय, पंथीय होत्या. त्याला विरोध करणाऱ्या दुसऱ्या धर्मीय, पंथीय, विचारधारा तयार झाल्या. सुरुवातीचे दहशतवादी हल्ले अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेमुळे झाले,’ अशा शब्दांत त्यांनी दहशतवाद आणि जागतिक अर्थकारण यांची सांगड घातली. कोणत्याही सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय समस्यांच्या मुळाशी अर्थकारण असते, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

स्वदेशीचा विचार संकुचितपणाला जन्म देतो. राष्ट्रवादाचे भूत गाडले गेले नाही, तर मोठा कोलाहल निर्माण होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. त्याचवेळी मागील काळातील पुरोगामी वर्गाच्या आंधळय़ा विचारनिष्ठेमुळे प्रतिगामी वर्गाला उत्तेजन मिळाले, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष फादर दिब्रिटो यांनी गिरीश कुबेर यांच्या भाषणाचा संदर्भ देत जग प्रगत पण अस्वस्थ असल्याचे सांगितले. ‘जे जे मानवी आहे ते आध्यात्मिक आहे. कोणत्याही प्रश्नाला हिंसा हे उत्तर नाही. शांतीशिवाय प्रेमाशिवाय तरणोपाय नाही,’ असेही दिब्रिटो म्हणाले.