‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’मध्ये येत्या रविवारी विरारमध्ये चर्चा

वसई : वसई-विरार शहरांमध्ये वाहतूक कोंडी तर नित्याची आहे. फेरीवाले तर कोणालाही न घाबरता थेट रस्त्यावर बस्तान मांडून आहेत. या साऱ्या  समस्यांना वाचा फोडण्यासाठी येत्या रविवारी, २८ जुलै रोजी विष्णु प्रतिभा हॉल, पहिला मजला विष्णू प्रसाद कॉम्प्लेक्स, उत्कर्ष विद्यालयासमोर , स्टेशन रोड

विरार (पश्चिम) येथे सायंकाळी ६ वाजता ‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’ कार्यक्रम होत आहे.

वसई-विरारकरांच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी ‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वसई-विरारमधील जनतेचे आजवरचे खुले व्यासपीठ म्हणून ‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’ उदयास आले आहे.

या वेळी पालिकेचे आयुक्त बी. जी. पवार, वसईचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील या कार्यक्रमात उपस्थित राहून नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत.

अरुंद रस्ते, बेसुमार वाहने, बेशिस्त रिक्षाचालक, नियोजनाचा अभाव आणि त्यात अनधिकृत फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाने वेढलेल्या वसई आणि विरार या शहरांना मोकळा श्वास कधी घेता येणार, हा सध्याचा मोठा प्रश्न आहे.

वसई आणि विरार शहरातील रस्ते आधीच अरुंद आहेत. त्यातही रस्त्यांवर जागोजागी अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे रस्त्यांची अवस्था बिकट आहे. बेसुमार खासगी आणि बेशिस्त रिक्षावाले हा एक मुद्दा आहे.  हजारो अनधिकृत रिक्षा रस्त्यावर धावत आहेत. बेदरकारपणे चालणारे पाण्याचे टँकर, बेकायदा वाहनतळांची यात भर पडली आहे. वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झालेली आहे.

शहरात सरकारी वाहनतळ वा खासगी सशुल्क वाहतनळ नसल्याने वाहने उभी करण्याची समस्या निर्माण झालेली आहे. वाहने जप्त केली, तर ठेवायची कुठे, असा प्रश्न वाहतूक पोलिसांपुढे आहे. शहराच्या वाहतुकीच्या समस्येचे निवारण करण्यासाठी वाहतुकीचा प्रस्तावित केलेला मास्टर प्लान लालफितीत अडकला आहे. हजारो अनधिकृत रिक्षा, टँकरने शहरात धुमाकूळ घातलेला आहे. त्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.

वसई-विरारमधील नागरिकांना भेडसावणाऱ्या या साऱ्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी ‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’ कार्यक्रमाचे आयोजन रविवारी विरारमध्ये करण्यात आले आहे. या कार्यक्रमात वसई-विरारकरांना पालिका तसेच सरकारी यंत्रणांमधील अधिकाऱ्यांना प्रश्न विचारण्याची संधी मिळणार आहे.

कधी?

रविवार, २८  जुलै

सायंकाळी ६ वाजता.

कुठे?

विष्णु प्रतिभा हॉल, पहिला मजला

विष्णू प्रसाद कॉम्प्लेक्स, उत्कर्ष विद्यालयासमोर स्टेशन रोड विरार (पश्चिम)