दुकाने न उघडल्याने अनेकांची निराशा

ठाणे : प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर भागात मद्यविक्रीला राज्य सरकारकडून हिरवा कंदील मिळताच शहरांमधील दारू दुकाने तातडीने सुरू होतील या अपेक्षेने सोमवारी सकाळपासूनच मद्यप्रेमींच्या भल्यामोठय़ा रांगा मद्यविक्री दुकानांसमोर लागल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी तर एक किलोमीटपर्यंत रांगा लागल्या होत्या. दरम्यान सायंकाळी उशिरापर्यंत यासंबंधी कोणताही निर्णय स्थानिक प्रशासनाकडून घेण्यात आला नसल्याने अनेकांना निराश होऊन परतावे लागले.

देशात टाळेबंदी लागू झाल्यानंतर जिल्ह्य़ातील सर्वच मद्याची दुकाने बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. त्यानंतर दीड महिन्यांपासून जिल्ह्य़ातील सर्वच ठिकाणी मद्याची दुकाने बंद आहेत. अखेर रविवारी रात्री राज्य सरकारने प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर सर्वच ठिकाणी मद्याची दुकाने खुले करण्याच्या सूचना दिल्या. यासंबंधीचे निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यामुळे सोमवारी सकाळपर्यंत जिल्ह्य़ातील दुकाने सुरू राहतील का नाही यात संभ्रम कायम असला तरी या निर्णयाची वाट पाहण्याचे टाळत ठाण्यातील बहुतेक सर्वच मद्याच्या दुकानाबाहेर मद्यप्रेमींनी रांगा लावत गर्दी केली होती.

ठाण्यातील गोखले रोड, कासारवडवली, वर्तकनगर, हरिनिवास सर्कल यांसारख्या अनेक भागात नागरिकांनी गर्दी केली होती. वर्तकनगर येथील विजयनगर परिसरात करोना रुग्णांची संख्या अधिक आहे. मात्र, त्यानंतरही येथील परिसरातील मद्याच्या दुकानाबाहेर गर्दी झाली होती. पोलिसांनी हुसकावल्यानंतर मद्यप्रेमींनी घरचा रस्ता धरला. कल्याण-डोंबिवलीतील महात्मा फुले रस्ता, मानपाडा, शिळफाटा, महात्मा गांधी मार्ग, घरडा सर्कल, मुरबाड मार्ग या ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रखरखत्या उन्हातही हे नागरिक मद्याची खरेदी करण्यासाठी रांगा लावून बसल्याचे चित्र होते.

उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील विविध भागांमधील दुकानांबाहेर ग्राहकांनी गर्दी केली होती. उल्हासनगरच्या मुख्य बाजारांमधील मद्याच्या दुकानांतही मोठी गर्दी झाली होती. अंबरनाथ शहरात काही दुकानदारांनी रात्रीच दुकानांबाहेर सामाजिक अंतर राखण्यासाठी खुणा आखल्या होत्या, तर सकाळी आठ वाजल्यापासून शहरात विविध दुकानांवर रांगा लागण्यास सुरुवात झाली होती.