मीरा-भाईंदर महापालिकेकडून कंत्राटदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न

भाईंदर : भाईंदर पूर्व परिसरातील काशी नगर परिसरात तयार करण्यात येत असलेल्या  रस्त्याचे काम निष्कृष्ट दर्जाचे होत असल्याचे समोर आले आहे. रस्ता डांबरीकरण करण्यापूर्वीच प्रवास करत असलेला ट्रक चक्क त्यात अडकला असल्याचे आढळले.

भाईंदर पूर्व परिसरातील प्रफुल्ल पाटील चौक ते विमल डेअरीपर्यंत सिमेंट रस्तानिर्मितीचे  काम करण्यात येत आहे. यूटीडब्लूटी पद्धतीने करण्याच्या कामाचे कंत्राट ८ मार्च २०१९ रोजी रिद्धिका इंटरप्रायझेस या ठेकेदारास  दिले होते .

विशेष  म्हणजे महापालिकेच्या स्वत:च्याच अंदाजपत्रकानुसार या कामाची निविदेतील अंदाजित रक्कम २ कोटी ८५ लाख ८८ हजार ६२६ रुपये इतकी  ठरवण्यात आली होती;परंतु पालिकेने सदर ठेकेदारास हे काम तब्बल ३० टक्के जास्त दराने म्हणजेच ३ कोटी ७१ लाख ३६ हजार रुपये इतक्या किमतीचे दिले आहे. या कामादरम्यान अनेक त्रुटी निदर्शनास आल्या होत्या; परंतु प्रशासनाकडून त्यावर दुर्लक्षपणा केला असल्याचे आरोप स्थानिक नागरिकांनी केले आहेत.

गेल्या १५ दिवसांपूर्वी या भागातील सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले असून शिल्लक काम पावसाअभावी नंतर  करण्यात येणार होते. त्याकरिता या भागात खडी टाकून रस्तारुंदीकरण करण्यात आले होते; परंतु प्रवास करत असलेल्या ट्रकचे चाक रस्ता खचून त्यात अडकल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे या संदर्भात कोणालाही कळू नये म्हणून ठेकेदाराने चक्क तो रस्ता पुन्हा खडी टाकून तात्काळ  भरला; परंतु  स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आल्याने त्यांनी या संदर्भात पालिके कडे तक्रार केली.

प्रशासनाकडून कंत्राटदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न

या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागातील उपअभियंता नितीन मुकणे यांना विचारणा केली असता त्यांनी ट्रकची घटना त्या मार्गावर नव्हे तर त्या मार्गावरील आतील बाजूस असलेल्या मार्गावर झाल्याचे सांगितले. तसेच त्या भागात काम उत्तम प्रकारे सुरू असून तक्रार नसल्याचे सांगत त्यांनी कंत्राटदाराची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला.

या संदर्भात माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल.

– डॉ. विजय राठोड, आयुक्त, मीरा भाईंदर महापालिका