वसई-विरार महापालिकेने शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधलेले जलकुंभ आता बेघर, भिखारी, गर्दुल्यांचे आश्रयस्थान बनले आहे. याठिकाणी त्यांनी आपले बस्तान मांडले असल्याने जलकुंभाच्या आवारात अस्वच्छता पसरली आहे.

महापालिकेने पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ठिकठिकाणी जलकुंभ बांधलेले आहेत, मात्र आता हे जलकुंभ भिक्षेकरी आणि बेघरांचे घर बनले आहेत. वसई गावात आणि विरारजवळील नवापूर येथे असलेल्या जलकुंभावर बेघरांनी आपले बस्थान मांडले आहे. वसईमधील जलकुंभासमोरच ग्रामपंचायत कार्यालय आहे, तर त्यालादेखील बेघर न जुमानता बिनधास्तपणे याठिकाणी राहतात. तसेच नवापूर येथील जलकुंभाकडेदेखील गेल्या काही महिन्यांपासून बेघर व गर्दुल्ल्यांनी राहण्यास सुरुवात केली आहे.

भिक्षेकरी आणि बेघर या ठिकाणी अंघोळ करतात, धुणीभांडी करतात तसेच अस्वच्छ कपडे धुऊन वाळत घालतात. याचबरोबर याठिकाणी स्वयंपाकदेखील करतात. ते झाल्यावर सर्व कचरा तसेच अंघोळीचे व धुण्याभांडय़ाचे पाणी जलकुंभाच्या आवारातच टाकले जाते. यामुळे मोठय़ा प्रमाणात अस्वच्छता पसरत आहे. तर जलकुंभाला जोडलेल्या जलवाहिनीकडेदेखील कचरा व घाण पाणी पडत असल्याने नागरिकांना अस्वच्छ पिण्याचे पाणी मिळण्याची शक्यता आहे.