विरोधीपक्ष नेत्यांची मागणी

भाईंदर  : मीरा-भाईंदर महापालिका हद्दीतील वाढती करोना रुग्णसंख्या, मनुष्य बाळाची कमतरता तसेच प्रशासनामधील समन्वयांचा आभाव पाहता राज्य शासनाकडून दखल घेण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांनी केली आहे.

फडणवीस यांनी शहरातील करोना परिस्थितीचा आढावा घेतला. शहरातील रुग्णालयाची पाहणी करून त्यांनी मनुष्यबळाची कमतरता,रुग्णांकरिता अपुऱ्या प्रमाणात ऑक्सिजन सामुग्री, तसेच स्वच्छतेच्या कमतरतेची मुख्य समस्या असल्याचे सांगितले. त्यामुळे प्रशासनाकडून यांवर गांभीर्याने लक्ष देऊन काम करण्यात यावे अशी सूचना आयुक्त डॉ. विजय राठोड यांना देण्यात आली असल्याचे सांगितले.

पालिकेचे उत्पन्न कमी असतानादेखील पालिकेला आरोग्य विषय गोष्टीचा खर्च उचलावा लागत आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून अनुदान देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. त्याचप्रमाणे खाजगी रुग्णालयात रुग्णाची आर्थिक लूट होत असल्यामुळे देयकांवर देखरेख ठेवणारे पथक तयार करण्यात यावे व कठोर कारवाई करण्यात यावी अशा सूचना त्यांनी आयुक्तांना दिल्या. सध्या शहरात करण्यात येणाऱ्या सामूहिक चाचणीचे प्रमाण  केवळ ७०० आहे. त्यामुळे हे प्रमाण कमी असल्यामुळे त्यात वाढ करण्यात यावी असे, मत त्यांनी मांडले.