अंबरनाथ, बदलापूरमधील प्रमुख रस्त्यांवर खड्डेच खड्डे
आजपासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सवामुळे अंबरनाथ, बदलापूरमधील नागरिकांचा उत्साह टिपेला पोहोचला असला तरी या शहरांतील भग्न रस्ते मिरवणुकीच्या आनंदावर विरजण घालण्याची शक्यता आहे. दोन्ही शहरांतील प्रमुख रस्ते जागोजागी उखडले असून अधूनमधून होत असलेल्या पावसामुळे ते चिखलमय झाले आहेत. गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्याचे दावे करणाऱ्या प्रशासनांनी प्रत्यक्षात काहीच कृती न केल्याने गणरायाचे आगमन खड्डेमय रस्त्यांवरून अडखळत होणार आहे.
अंबरनाथ, बदलापूर या शहरांमध्ये रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे सध्या सुरू आहेत. या कामांमुळे जागोजागी वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे. त्यातच इतर रस्त्यांवर खड्डे पडल्याने शहरातील वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. अंबरनाथ पश्चिमेकडे कल्याण-बदलापूर रस्त्याचे काम सध्या अर्धवट अवस्थेत असून येथील अतिक्रमणे तोडून तीन महिने उलटले असले तरी, या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. तसेच येथील अंतर्गत भागात चालण्यासाठी रस्तेच अस्तित्वात नसल्याचे चित्र दिसून आले आहे. यात मुख्यत्वे कोहोजगाव येथे जाणारा मुख्य रस्ता हा खड्डेमय झाला आहे. पूर्वेकडे कायमस्वरूपी खड्डय़ात असणारा बी-केबिन रस्ता, फातिमा शाळेकडे जाणारा रस्ता, शिवमंदिर रस्ता, वडवली परिसरातील रस्ते आदी रस्ते खड्डेमय आहेत. दरम्यान, या खड्डय़ांवर खडी टाकून हे खड्डे बुजविण्यात येणार असल्याचे पालिकेच्या अभियंत्याने स्पष्ट केले.
बदलापूर शहराची परिस्थितीदेखील अंबरनाथसारखीच असून येथे खड्डय़ांमुळे रस्त्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. पश्चिमेकडील बेलवली ते रेल्वे स्थानक रस्ता तसेच रेल्वे स्थानक ते उल्हास नदी रस्ता हा मुख्य रस्ता खड्डेमय असून याच मार्गावरून विसर्जन मिरवणूक निघून ती नदीकडे जाते. तर पूर्वेकडे नगर परिषद ते आदर्श महाविद्यालय, तेलवणे टॉवर ते रेल्वे स्थानक रस्ता आदी रस्ते खड्डय़ात असून शहरातील उड्डाण पुलावर नगर परिषदेच्या दिशेला असेच मोठे खड्डे आहेत. यामुळे नागरिकांच्या त्रासात भर पडली आहे.