झोपडय़ांसाठी बेकायदा रस्ता बनवण्यासाठी उद्योग

ठाणे खाडी परिसरातील खारफुटीच्या जंगलावर दिवसेंदिवस अतिक्रमण होत असून आता चक्क रस्त्याच्या उभारणीसाठी खारफुटींची कत्तल सुरू झाल्याचा प्रकार कोपरीत उघड झाला आहे. कोपरी परिसरातील स्वामी समर्थ रस्त्यावर दोन्ही बाजूस असलेल्या खारफुटीवर पंधरा दिवसांपासून मातीचा ढिगारा टाकला जात असल्याने या भागातील खारफुटीच्या जंगलाचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी आठ दिवसांपूर्वीच या ठिकाणचा रस्ता सुस्थितीत करण्यात आला आहे. मात्र हा परिसर कांदळवन विभागात येतो.

कोपरी खाडी परिसराजवळच प्रभाग क्रमांक ५२ मध्ये मीठबंदर येथे स्वामी समर्थ मठाकडे जाणारा मार्ग आहे. या रस्त्याच्या प्रवेशद्वारापासून खारफुटीच्या जंगलाला सुरुवात होते. या ठिकाणीच परिसरातील नागरिकांसाठी दोन महिन्यांपूर्वी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ओपन जिम बांधण्यात आली असून ही जिमही कांदळवनाच्या जागेत बांधण्यात आल्याचे पर्यावरण संस्थांकडून सांगण्यात येत आहे. या ओपन जिमपासून काही अंतरावर दोन्ही बाजूस गेल्या पंधरा दिवसांपासून मातीचा ढिगारा टाकण्यात आला आहे. अवघ्या दोन दिवसांत दोनशेच्या आसपास ट्रक मधून याठिकाणी माती आणून टाकण्यात आली, असे पर्यावरणप्रेमी रोहित जोशी यांनी सांगितले.  मठाच्या लगतच कांदळवन विभागाच्या जागेत अनधिकृत झोपडपट्टया वसलेल्या आहेत. या झोपडपट्टय़ांपर्यंत पोहचण्यासाठी सुस्थितीत रस्ता उपलब्ध नसल्याने झोपडपट्टय़ांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांकडून वारंवार पक्क्या रस्त्याची मागणी केली जात होती. त्यामुळे या ठिकाणी रस्ता तयार करण्यात आला असला तरी कांदळवनाच्या जागेत बांधलेल्या या अनधिकृत बांधकामाकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले असल्याचा दावा पर्यावरण संस्थांनी केला आहे. खारफुटीच्या अगदी जवळच असलेल्या झोपडपट्टय़ांमध्ये राहणारे रहिवासी कचरा खाडीतच टाकत असल्याने खारफुटीच्या जंगलावर कचऱ्याचे साम्राज्य तयार झाले आहे. हा रस्ता तयार करण्यासाठी रस्त्यालगत असलेली झाडेही तोडण्यात आली आहेत.