किशोर कोकणे

करोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून सावरत असलेल्या ठाण्यातील औद्योगिक क्षेत्राला आता स्थानिक प्रशासकीय यंत्रणांच्या न-नियोजनाचा फटका बसत आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणाऱ्या पाणीपुरवठय़ात चार दिवसांपासून खंड पडल्यामुळे वागळे इस्टेट औद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखान्यांतील व कंपन्यांतील कामे बंद पडली. काही उद्योजकांनी सहा दिवस कारखाने बंद ठेवल्याचे समजते.

ठाण्यातील वागळे इस्टेट भागात ६०० औद्योगिक भूखंड असून एक हजार उद्योग आहेत. याच भागात ५० पेक्षा अधिक माहिती तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांचे हब आहेत. जिल्ह्य़ातील विविध भागांतून ५० हजारांहून अधिक कामगार या ठिकाणी कामासाठी येत असतात. या उद्योगांना आणि कंपन्यांना दररोज १० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. दर आठवडय़ाला शुक्रवारी जलवाहिन्यांची दुरुस्ती करण्यात येत असते. त्यासाठी गुरुवारी दुपारपासूनच या भागातला पाणीपुरवठा बंद केला जातो. त्यामुळे शनिवारी उद्योगांना पाणीपुरवठा होणे अपेक्षित होते. मात्र शनिवारी खिडकाळी भागात अचानक जलवाहिनी फुटली आणि एमआयडीसीची पाणी वितरण व्यवस्थाच कोलमडून पडली. गुरुवारपासून वागळे इस्टेट परिसरात बंद झालेला पाणीपुरवठा अजूनही सुरळीत झालेला नाही, अशी माहिती येथील उद्योजकांनी लोकसत्ताशी बोलताना दिली. त्यामुळे या भागातील काही उद्योजकांनी त्यांच्या ५० टक्के कर्मचाऱ्यांना कामासाठी बोलविले नव्हते. जे कामगार कामावर येत होते. ते कामासाठी निघताना घरातूनच पिण्याच्या पाण्याच्या दोन ते तीन बाटल्या आणत आहेत. तर ज्या उद्योगांचे उत्पादन पाण्याशिवाय होत नाही, त्यांना काम कसे करावे, असा प्रश्न  पडला आहे.

टँकरचे दरही चढेच

ज्या उद्योगांमध्ये किंवा आयटी कंपन्यांत कामगारांची संख्या अधिक आहे त्यांना दिवसाला दोन ते तीन टँकर पाणी लागत आहे. टँकरचालकांकडून एका टँकरचे १५०० किंवा २००० रुपये दर आकारले जात आहे. त्यामुळे दिवसाला कंपनी आणि उद्योजकांचे तीन ते सुमारे पाच हजार रुपये पाण्यात जात आहे, असे ‘टिसा’चे सचिव एकनाथ सोनावणे यांनी सांगितले.

आयटी पार्क निर्जळी

आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा सर्वाधिक फटका सहन करावा लागत आहे. स्वच्छतागृहात पाणी नसल्याने महिलांचे हाल होत आहे. त्यामुळे महिलांना परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करावा लागत आहे, असे टिसाचे मानद सहसचिव ए. वाय. अकोलावाला यांनी सांगितले. काही इमारतींमधील कार्यालयांमधील व्यवस्थापनाने टँकर मागवून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. तरीही पाणीपुरवठा खंडित होण्याचे प्रकार आता नित्याचे झाल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

गेल्या सहा दिवसांपासून वागळे इस्टेटमधील उद्योगांना पाणीपुरवठा झालेला नाही. पायाभूत सुविधा मिळत नसल्यास उद्योग चालवावे कसे, असा प्रश्न पडला आहे.

– संदीप पारेख, उपाध्यक्ष, टिसा

वागळे इस्टेट येथील उद्योगक्षेत्रात १० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. तांत्रिक बिघाडामुळे या वागळे इस्टेट भागात पाणीपुरवठा बंद आहे. बिघाडाची दुरुस्ती झाली असून लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल.

–  सुधाकर वाघ, मुख्य अभियंता, एमआयडीसी.