एखादा विषय आपल्या मनाला चटका लावून जातो हे त्या विषयाचे यश असते. किल्ला चित्रपटातील चिन्मय हा त्याच्या आईला चित्रपटाच्या सुरुवातील तिची बदली रद्द होऊ शकत नाही का असा प्रश्न करतो, मात्र त्याचे खरे मर्म प्रेक्षकांना चित्रपटाच्या शेवटी तो पुन्हा एकदा त्याच्या आईला बदली रद्द होऊ शकत नाही का असे विचारतो आणि सर्वाच्या मनाला एकच चटका लावून जातो. हेच चित्रपटाचे यश असून सर्व स्तरातील प्रेक्षकांच्या तो पसंतीस उतरत आहे याचा नक्कीच आनंद वाटतो असे मत अभिनेत्री अमृता सुभाष हिने येथे व्यक्त केले.
सर्व वयोगटातील प्रेक्षकांना नवा चित्रानुभव देणारा, त्यातील व्यक्तिरेखांशी आपलेही एक नाते नकळत निर्माण करणारा किल्ला चित्रपट प्रदर्शित झाला. दोन दिवसातच मिळणाऱ्या प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे किल्ला टिम सध्या प्रेक्षकांच्या भेटीला विविध थिएटरला भेटी देत आहेत. रविवारी डोंबिवलीतील टिळक टॉकीजला चित्रपटातील बालकलाकार अर्चित देवधर, स्वानंद रायकर, अथर्व उपासनी, गौरीश गावडे आणि अभिनेत्री अमृता सुभाष हिने भेट दिली यावेळी तिने वरील मत व्यक्त केले. चिन्मयचा अभिनय आणि त्याची कथा प्रेक्षकांना भावतेच आहे, शिवाय त्यातील बंडय़ाची व्यक्तिरेखा साकारणारा पार्थ भालेराव मात्र सर्वाचे लक्ष वेधून घेत असून त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांची जास्त पसंती लाभत आहे, असे अमृता म्हणाली. प्रतिसाद हा शेवटी प्रेक्षकांवर अवलंबून असतो. पार्थचे पात्र एका वेगळ्या पद्धतीचे मनोरंजन करते, तर अर्चित, गौरीश, अथर्व, स्वानंद यांच्याही भूमिका या वेगळ्या पद्धतीचे मनोरंजन करतात. काही पात्र सखोल असतात. चिन्मय काळेची ही कथा असून त्याचे पात्र हे विचार करायला लावते, असेही ती म्हणाली.
आई वडीलांच्या मृत्युमुळे मुलांच्या मनावर झालेले आघात या चित्रपटातून अधोरेखित करण्यात आले आहेत. दु:ख पचवलेल्या या मुलांचे केवळ बडखोरीचेच नव्हे तर इतरही अनेक पैलू या सिनेमात दाखविले आहेत. या पाच मुलांमध्ये जुळलेले बंध, त्यांचे फुलत गेलेले नाते, त्यांच्या सुंदर आठवणी हे सगळं एक वेगळाच अनुभव प्रेक्षकांना देते. सिनेमातून संदेश असा काही द्यायचा आम्ही प्रयत्न केलेला नाही. उपदेश करण्यासाठी सिनेमा असून नये ते एक मनोरंजनाचे माध्यम असून उपदेश देण्यासाठी नाही तर मनोरंजनासाठी आम्ही सिनेमा करतो. डोंबिवलीचे आणि मराठी चित्रपटांचे एक वेगळेच समीकरण आहे, येथे मराठी चित्रपटांना नेहमीच चांगला प्रतिसाद लाभलेला आहे. सिनेमा गृहात पिकणारा हशा पहाता आम्हाला असे वाटते नाटकात जसे प्रेक्षक दाद देताना त्याचे संवाद जाऊ नये म्हणून कलाकार थांबतात तसेच आता चित्रपटातही काही तरी युक्ती लढवावी की काय असे प्रेक्षकांचा प्रतिसाद पहाताना अनुभवायला मिळाले. या चित्रपटाला बर्लिनचा पुरस्कार मिळाला त्यानंतर राष्ट्रीय पुरस्काराची मोहोर उमटली. प्रेक्षकांचा मिळालेला पुरस्कार ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे असेही ती म्हणाली.
चित्रपटातील बाल कलाकार यांनी त्यांचे विविध अनुभव यावेळी कथन केले.