साहित्य संमेलन दहा दिवसांवर असतानाही कार्यक्रमांची रूपरेषा अनिश्चित?

अत्यंत गाजावाजा करून साहित्य संमेलनाचे यजमानपद मिळवणाऱ्या डोंबिवलीतील साहित्य संमेलनाच्या वाटेतील काटे अजूनही दूर झालेले नाहीत. संमेलनस्थळ असलेल्या क्रीडासंकुलातील कचरा हटवण्यात आला नसल्याचे उघड होत असतानाच, या संमेलनाची कार्यक्रम पत्रिकाही अद्याप प्रसिद्ध झालेली नाही. संमेलन दहा दिवसांवर आले असतानाही अद्याप महत्त्वाची पूर्वतयारी होऊ न शकल्याने संमेलनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आता डोंबिवलीकरांनाच शंका येऊ लागली आहे. संमेलनातील कार्यक्रमांची कच्ची रूपरेषा तयार असून दोन दिवसांत तिला अंतिम स्वरूप दिले जाईल, असे आयोजकांनी म्हटले आहे.

फेब्रुवारीत होणाऱ्या ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तीन दिवसांत एकूण २४ कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडासंकुलात यासाठी आठ व्यासपीठे उभारण्यात येणार आहेत. तसेच सावित्रीबाई फुले रंगमंदिरातील व्यासपीठाचाही कार्यक्रमासाठी उपयोग करण्यात येणार आहे.

संमेलनाला आता जेमतेम १३ दिवस उरले असले तरी अद्याप कार्यक्रम पत्रिका प्रसिद्ध करण्यात आली नसल्याने साहित्य वर्तुळात नाराजी आहे. यंदाचे संमेलन आधीच्या संमेलनापेक्षा वेगळे असेल, असा दावा आयोजकांतर्फे वारंवार केला जात आहे. मात्र, ते वेगळेपण काय, हे जाणून घेण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. संमेलनाची कच्ची रूपरेषा तयार असून लवकरच त्याला अंतिम रूप देऊन ती प्रसिद्ध करण्यात येईल, असे आयोजन समितीतील प्रतिनिधींनी सांगितले.

आयोजन समितीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ३ फेब्रुवारी रोजी ग्रंथदिंडी, ध्वजारोहण, समंलेनाचे उद्घाटन, ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन व कविसंमेलन पार पडेल. त्याच्या दुसऱ्या दिवशी अध्यक्षीय भाषणावर चर्चा, परिसंवाद, नवोदित लेखकांचा मेळावा, बालकुमार मेळावा, मनोरंजनपर कार्यक्रम होणार आहेत. तर शेवटच्या दिवशी, ५ फेब्रुवारीला बोलीकथा, परिसंवाद, विचार जागर, प्रतिभायान, कविसंमेलन, खुले अधिवेशन आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

निधीसाठी आधारस्तंभचा टेकू

साहित्य संमेलनाच्या परंपरेत स्वागत समिती सदस्य होण्यासाठी शुल्क निश्चित केले जाते. या संमेलनासाठी तीन हजार रुपये शुल्क आहे. यामध्ये समिती सदस्यांना वेगळी आसन व्यवस्था, भोजन आणि स्मरणिका मिळणार आहे. निधी संकलनाचा भाग म्हणून यावेळी संमेलन संयोजकांनी आधारस्तंभ व आश्रयदाता अशी टूम काढून निधी संकलनाची नवीन क्लृप्ती लढवली आहे. स्वागत समिती आधारस्तंभसाठी २५ हजार रुपये शुल्क आहे. तसेच आश्रयदात्यासाठी १० हजार रुपये शुल्क आहे. त्यांची विशेष बडदास्त ठेवली जाणार आहे.

संमेलन कार्यक्रम पत्रिका अंतिम करण्यात आली आहे. वेळेचे बंधन आणि उपलब्ध कार्यक्रम यांचे नियोजन पाहून त्याप्रमाणे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. उपलब्ध व्यासपीठ, वेळेत दिवसाचे कार्यक्रम पार पाडावेत असे नियोजन आहे.

शरद पाटील, संमेलन संयोजक