वसई, ठाण्यातील मच्छीमारांना पालघरमध्ये विरोध; अतिक्रमणाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा

नियम धाब्यावर बसून वसई तालुका आणि ठाणे जिल्ह्य़ातील मच्छीमार पालघर ते नारगोळ भागातील समुद्रात अतिक्रमण करून मासेमारी करत असल्याने त्याविरोधात स्थानिक मच्छीमार एकवटले आहेत. वसई, ठाण्यातील मच्छीमार आमच्या हद्दीत मासेमारी करत असल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप स्थानिक मच्छीमारांनी केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून समुद्रतील हद्दीचा वाद पुन्हा उफाळून आला असून अतिक्रमणाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा पालघरमधील मच्छीमारांनी दिला आहे.

गावासमोरील २५ अंश कोनाच्या क्षेत्रामध्ये त्या गावातील मच्छीमारांनी मासेमारी करण्याची पारंपरिक पद्धत आहे. समुद्राच्या तळाला लाकडी खुटे, लोखंडी खांब गाडून त्याला दोराच्या साहाय्याने जाळ्या बांधून कव (सिगनेट) पद्धतीची मासेमारी करण्यात येते. २० वाव खोल पाण्यात आणि पाच ते ४०-४५ नॉटिकल मैलापर्यंतच्या अंतरावर  ‘कव’ रोवून मासेमारी केली जायची. मात्र उत्तन, चौक, डोंगरी, पाली आणि वसई भागातील अनेक मच्छीमारांनी कव मच्छीमारी पद्धतीबाबत समाजामध्ये असलेले नियम धाब्यावर बसवून पालघर-डहाणू तालुक्यांतील मच्छीमारांच्या कवच्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण केले असल्याचा आरोप करण्यात येत आहेत. त्याचबरोबर ठाणे-वसई भागांतील मच्छीमार इतर गावांसाठी असलेल्या क्षेत्रामध्ये आपल्या कव उभारतात. इतर लहान मच्छीमारांनी त्यांच्या क्षेत्रांत मारलेल्या कव उखडून टाकतात, तसेच इतर मासेमारी साहित्याची नासधूस करतात, असे आरोप केले जात आहेत. यामुळे पालघर, डहाणू तालुक्यांसह दक्षिण गुजरातमधील मच्छीमार बाधीत झाला असून या घुसखोरीविरोधात आवाज उठवण्यासाठी एकत्र आला आहे.

बाहेरील मच्छीमारांच्या अतिक्रमणामुळे पालघर-गुजरातमधील मच्छीमारांनी १४ ऑक्टोबर रोजी सातपाटी येथे संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी दातिवरे, एडवण, उसरणी, केळवे, माहीम, टेंभी, वडराई, सातपाटी, मुरबे, नवापूर, पोफरण-दांडी, उच्छेळी, गोंगवाडा, धाकटी डहाणू, डहाणू, झाई, उंबरगाव, नारगोळ आणि दमण या परिसरांतील १८ मच्छीमार सहकारी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बाहेरून येणारे मच्छीमार स्थानिक मच्छीमारांची कवच्या खांबामध्ये रोवलेली जाळी उपटून टाकतात, दोर व जाळी कापून टाकतात, दालदा मासेमारीकरिता अडथळा निर्माण करतात, समुद्रातील मासेमारी क्षेत्र व्यापून टाकतात, असे आरोप या बैठकीत मांडण्यात आली. याप्रकरणी जिल्हाधिकारी आणि मत्स्यव्यसाय विभागणी सर्व संबंधित मच्छीमारांची संयुक्त बैठक आयोजित करून या वादामध्ये तोडगा काढण्यासंदर्भात निवेदन देण्याचे ठरवण्यात आले. यासंदर्भात ठोस उपाययोजना न झाल्यास आणि अतिक्रमण रोखले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा मच्छीमार संयुक्त समितीने दिला आहे.

कव आणि दालदा पद्धतीने मासेमारी करणाऱ्यांमध्ये खूप जुना वाद आहे. हा वाद १२ नॉटिकल मैल पलीकडे होत असला तरी समन्वयाने मार्ग काढणे आवश्यक आहे. दोन्ही बाजूंमध्ये अलीकडच्या काळात वाद झाल्याची तक्रार आपल्या कार्यालयात नाही. अशी तक्रार आल्यास सर्व संबंधितांची संयुक्त बैठकीचे आयोजन करणे सयुक्तिक ठरेल.    – दिनेश पाटील, साहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग