News Flash

लॉकडाउनच्या भीतीने बदलापुरात उसळली तुफान गर्दी

आठ दिवसांच्या लॉकडाउनचे संदेश प्रसारित झाल्याने गोंधळ

शनिवारपासून आठ दिवस कडक लॉकडाउन लागू होणार असल्याच्या चर्चेने शुक्रवारी बदलापूर बाजारपेठेत नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली. गुरूवारी पालिका मुख्यालयात स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर शहरात कडक निर्बंध लावण्यात येतील अशी माहिती प्रसारित झाली. मात्र त्याबाबत कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाने कोणतेही अधिकृत पत्रक जाहीर केले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. फक्त औषधालये सुरू राहतील असे संदेश प्रसारित झाल्याने नागरिकांनी शुक्रवारी सकाळपासूनच बाजारपेठांमध्ये गर्दी केली होती. त्यामुळे संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.

रूग्णसंख्या कमी करण्याच्या हेतूने गुरूवारी कुळगाव बदलापूर नगरपालिका मुख्यालयात स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत पालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांनी बैठक पार पडली. या बैठकीत मुरबाडच्या धर्तीवर आठ दिवसांचा कडक लॉकडाउन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. ही बैठक संपन्न होताच स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी शनिवारपासून बदलापूर शहरात कडक लॉकडाउन लागू करणार असल्याबाबतचा संदेश चित्रफितीतून देण्यात आला. कुळगाव बदलापूर नगरपालिकेने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केली नाही.

चित्रफित आणि संदेश शहरभर प्रसारित झाल्य़ाने एकच खळबळ उडाली. शनिवारपासून लॉकडाउन होणार असल्याने नागरिकांनी शुक्रवारी सकाळपासूनच खरेदीसाठी बाजारपेठेत धाव घेतली. सर्वाधिक गर्दी शहरातल्या किराणा दुकानांवर झाल्याचे पहायला मिळाले. बदलापूर पश्चिम आणि पूर्वेला बाजारपेठांमध्ये नागरिकांनी गर्दी केली होती. बदलापूर पश्चिमेच्या बाजारपेठांमध्ये रस्ते गर्दीने खच्चून भरले होते. त्यामुळे स्थानक परिसरात वाहतूक कोंडीही झाली होती. यावेळी अंतरनियमांचा फज्जा पहायला मिळाला.

भाजी, दूध, एमटीएम, बँकेतही नागरिकांनी मोठमोठ्या रांगा लावल्या होत्या. स्थानक आणि बाजारपेठेकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे बस स्थानक, उड्डाणपूल, मांजर्ली रस्ता, रमेशवाडी रस्ता कोंडीत अडकला होता.

लॉकडाउन नव्हे, तर कडक अंमलबजावणी
शहरात कोणत्याही प्रकारचा नवा लॉकडाउन लागू करण्याचा विचार नसून फक्त राज्य शासनाने लागू केलेल्या लॉकडाउनचीच कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याचे कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले आहे. लवकरच याबाबत पत्र प्रसिद्ध करून पालिकेची भूमिका स्पष्ट करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2021 11:32 am

Web Title: markets flooded with people over lockdown rumour in badlapur sgy 87
Next Stories
1 ‘कोव्हॅक्सिन’साठी धावाधाव
2 जिल्ह्य़ात ६ नवी लसीकरण केंद्रे
3 गतवर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाणीसाठा
Just Now!
X