जलसंपदामंत्र्यांच्या आदेशाला स्टेम प्राधिकरणाकडून केराची टोपली
ठाणे जिल्ह्य़ाच्या पाणीपुरवठय़ाचे नवे वेळापत्रक लघू पाटबंधारे विभागाकडून मागे घेण्यात आल्यानंतर जलसंपदामंत्र्यांनी मीरा-भाईंदरला पाणीकपातीमधून दिलेली सवलत पुन्हा लागू होण्याची अपेक्षा बाळगली जात होती. मात्र स्टेम प्राधिकरणाने गुरुवार व शुक्रवार पाणीकपात केल्याने प्राधिकरणाकडून जलसंपदामंत्र्यांचे आदेश धाब्यावर बसविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
मीरा-भाईंदरला गरजेपेक्षा तब्बल चाळीस दशलक्ष लिटर पाणी कमी मिळत आहे. त्यामुळे इतर महापालिकांच्या तुलनेत मीरा-भाईंदरमध्ये दरडोई मिळणाऱ्या पाण्यात मोठी तफावत आहे. शहरातली पाण्याची गंभीर स्थिती लक्षात घेऊनच जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मीरा-भाईंदरला पाणीकपातीमधून वगळण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही सवलत लागूही झाली. मात्र लघू पाटबंधाऱ्याने शनिवार व रविवार उल्हास नदीत पाणीच न सोडण्याचे नवे धोरण लागू केल्यानंतर या सवलतीचे पालन करणे स्टेम प्राधिकरणाला शक्य होत नव्हते. मात्र लघू पाटबंधारे विभागाच्या नव्या धोरणामुळे पाणीटंचाई कमी होण्याऐवजी अधिकच तीव्र झाली. त्यामुळे लघू पाटबंधारे विभागाला आपले धोरण अवघ्या एका आठवडय़ातच गुंडाळावे लागले आणि पाणीकपातीचे पूर्वीचेच वेळापत्रक लागू झाले.
नवे धोरण गुंडाळण्यात आल्यानंतर जलसंपदामंत्र्यांनी मीरा-भाईंदरला पाणीकपातीमधून वगळण्याच्या आधीच्या आदेशांचे स्टेम प्राधिकरणाने पुन्हा पालन करणे आवश्यक होते. मात्र मीरा-भाईंदरला दिलेली सवलत रद्द करण्यात आल्याचे कोणतेही लेखी आदेश प्राधिकरणाला आलेले नसतानाही स्टेमने मीरा-भाईंदरची पाणीकपात सुरूच ठेवली आहे. त्यामुळे जलसंपदामंत्र्यांनी दिलेली सवलत कागदावरच राहिली आहे.
गेल्या आठवडय़ात गुरुवार व शुक्रवार स्टेम आणि एमआयडीसीचा पाणीपुरवठा बंद राहिला. पाणीपुरवठा पूर्ववत होत नाही, तोच एमआयडीसीची जलवाहिनी फुटली. परिणामी मीरा-भाईंदरला तब्बल चार दिवस पाणीच मिळालेले नाही.

विशेष बाब म्हणून जलसंपदामंत्र्यांनी मीरा-भाईंदरला पाणीकपातीमधून सवलत देण्याचे आदेश स्टेमला दिले आहेत. या आदेशांचे पालन होणे आवश्यक आहे, मात्र तसे होत नसल्याने ही बाब जलसंपदामंत्र्यांच्या कानावर घालण्यात येईल.
– गीता जैन, महापौर, मीरा भाईंदर

मीरा-भाईंदरला पाणीकपातीमधून वगळण्यात यावे, असे कोणतेही स्पष्ट आदेश जलसंपदामंत्र्यांनी याआधी दिले नव्हते. आता लघू पाटबंधारे विभागाने ४० टक्केपाणीकपात लागू करण्याचे आदेश दिले असून त्यात सर्व महापालिकांचा समावेश आहे. त्यामुळेच मीरा-भाईंदरलाही पाणीकपात लागू झाली आहे
– कर्नल विवेकानंद चौधरी,
व्यवस्थापकीय संचालक, स्टेम प्राधिकरण.