29 September 2020

News Flash

पैसे द्या, कार्यकर्ते घ्या!

राजकारणाचे व्यावसायिकीकरण झाल्यापासून कार्यकर्तेही व्यावसायिक झाले आहेत.

पालिका निवडणुकीसाठी कार्यकर्ते पुरवण्याचा धंदा तेजीत; २०० ते ५०० रुपयांपर्यंत दर

निवडणुकीचा प्रचार म्हटला की कार्यकर्ते हवेतच. ज्या उमेदवाराकडे जास्त कार्यकर्ते, त्याचा अधिक जोर असे सर्वसाधारणपणे गणित मांडले जाते. पूर्वी तन-मन-धन अर्पण करून आणि प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन पक्षासाठी झटणारे कार्यकर्ते दिसत. परंतु राजकारणाचे व्यावसायिकीकरण झाल्यापासून कार्यकर्तेही व्यावसायिक झाले आहेत. महापालिकेच्या निवडणुकीसाठी आता २०० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत पैसे घेणारे कार्यकर्ते सहज मिळू लागले आहेत.

निवडणुका कार्यकर्त्यांच्या जोरावरच जिंकल्या जातात. उमेदवाराची माहिती पत्रके आणि मतदार चिठ्ठय़ा वाटणे, प्रचार रॅलींमध्ये सहभागी होणे, जाहीर सभांमधून शक्तिप्रदर्शन करणे आदी कामे पक्षाचे कार्यकर्ते पार पाडत असतात. पूर्वी लोकप्रतिधी हे समाजसेवेसाठी वाहून घेतलेले असल्याने कार्यकर्तेही निवडणुकीच्या काळात आपली सर्व कामे बाजूला ठेवून नि:स्वार्थी भावनेने पक्ष कार्य करत असत. पूर्वी केवळ वडापाव खाऊन पक्षाचे काम करत होतो, असे ज्येष्ठ कार्यकर्ते आजही अभिमानाने सांगतात, परंतु परिस्थिती बदलत गेली तसे राजकारणही बदलत गेले. नेते बदलले तसे कार्यकर्तेही बदलले. आज कोणतीही अपेक्षा न बाळगणारे कार्यकर्ते मिळणे दुरापास्त झाले आहेत. मीरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असल्याने सध्या भाडय़ाच्या कार्यकर्त्यांना मोठीच मागणी आली आहे. २०० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत कामाच्या स्वरूपानुसार हे कार्यकर्ते उपलब्ध होत आहेत. कार्यकर्त्यांचा पुरवठा करणारे कंत्राटदारही सक्रिय झाले असून त्यांना मिळणाऱ्या मोबदल्यावर ते हव्या तेवढय़ा कार्यकर्त्यांचा पुरवठा करत आहेत.

ऐसे कार्य करिती कार्यकर्ते..

  • प्रचारासाठी दोन ते तीन तास फिरायचे असेल तर महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांसाठी २०० ते ३०० रुपये, दिवसभर कार्यालयात बसायचे असेल ५०० रुपये असे दर सर्वसाधारणपणे आकारले जात आहेत.
  • कार्यकर्त्यांना चहा आणि नाश्ता द्यायचा की नाही हे उमेदवारावर अवंलबून आहे, त्याची जबरदस्ती केली जात नाही.
  • दुचाकीस्वारांसाठी वेगळे दर आहेत. ज्याच्याकडे दुचाकी आहे, त्याने प्रचार रॅलीत दुचाकी फिरवायची, पेट्रोलचा खर्चही करायचा, बदल्यात त्याला प्रतिदिन एक हजार रुपये दिले जातात.
  • महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तरुणांचा कार्यकर्ते म्हणून अधिक भरणा असतो.
  • सकाळी एका उमेदवाराच्या रॅलीत दोन तास फिरल्यानंतर संध्याकाळी दुसऱ्या प्रभागात वेगळ्या उमेदवाराच्या प्रचार रॅलीत सहभागी होतानाही कार्यकर्ते दिसत आहेत.

सोयीसुविधांचा पुरवठा

निवडणूक खर्च मर्यादा केवळ सात लाख रुपये असल्याने कार्यकर्त्यांवर होणारा खर्च कोणताही उमेदवार दाखवत नाही हे जगजाहीर आहे. केवळ कार्यकर्त्यांचे भाडे देऊन उमेदवाराचे भागत नाही. कंत्राटी कार्यकर्त्यांव्यतिरिक्त स्वत:चे खास असे दहा-बारा कार्यकर्ते प्रत्येक उमेदवाराकडे असतात. त्यांच्यावर होणारा खर्च आणखी निराळा करावा लागतो. अशा कार्यकर्त्यांची रात्री खास वेगळी ‘सोय’ करावी लागते. मीरा-भाईंदर शहरातील महामार्गालगतचे सर्व बार बंद असले तरी शहरातील आतील बार सध्या तुडुंब भरलेले दिसतात ते यामुळेच.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2017 2:24 am

Web Title: mira bhayander municipal corporation election 2017 mira bhayander corporation
Next Stories
1 ऑनलाईन साईटवरुन लग्न ठरवताय? सावधान!
2 धरण काठोकाठ, तरीही पाणीटंचाई
3 तलावातील मृतदेह शोधण्यासाठी आधुनिक प्रणाली
Just Now!
X