कर्मचाऱ्यांचे पाच दिवसापासून आंदोलन सुरू

भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाचा तिढा अधिक जटिल झाला असून आता प्रकरण चक्क काशिमीरा पोलीस ठाण्यात पोहचले आहे.गेल्या पाच दिवसापासून पगार होत नसल्यामुळे कर्मचारी बस डेपोबाहेर आंदोलनाला बसले आहेत तर कंत्राटदार बस ताब्यात घेण्याकरिता प्रयत्न करत आहेत.

करोना काळात परिवहन सेवा ठप्प ठेवल्यामुळे प्रशासन आणि कंत्राटदारांमध्ये वादास सुरुवात झाली होती. परिवहन कर्मचाऱ्यांना गेल्या ६ महिन्यापासून पगार न दिल्यामुळे कंत्राटदारावर कामगारांकडून गंभीर आरोप करण्यात येत होते त्यामुळे ठेका रद्द करून परिवहन सेवा आपल्या ताब्यात घेण्याकरिता प्रशासनाकडून कंत्राटदाराला नोटीस बजावण्यात आली होती. परंतु राजकीय पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे पुन्हा कंत्राटदाराला बस सेवा सुरू करण्याची मुभा प्रशासनाकडून देण्यात आली. मात्र कंत्राटदाराने कर्मचाऱ्यांना अद्यापही वेतन न दिल्यामुळे कामगारांचा विरोध कायम आहे.

गेल्या आठवडय़ात महानगरपालिकेने सुचविलेल्या १० मार्गावर बसेस सुरू करण्याचे तसेच २८ सप्टेंबरपासून महापालिकेने सुचविलेल्या अन्य मार्गावर महापालिका देईल त्या वेळापत्रकानुसार बसेस नियमित सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले होते.

परंतु पगार उपलब्ध होईपर्यंत एकही बस डेपोबाहेर काढू देणार नसल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला दिला होता. त्यानुसार गेल्या पाच दिवसापासून कर्मचारी घोडबंदर येथील परिवहन डेपोबाहेर आंदोलन करत आहेत. तर बस गाडय़ा बाहेर काढण्यास मिळत नसल्यामुळे प्रशासन आणि कंत्राटदार यांनी पोलीस मदतीकरिता काशिमीरा पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.

बंदोबस्त केवळ बस संरक्षणाकरिता

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातील कंत्राटदार आणि कर्मचाऱ्यांचा वाद तापत चालला आहे. त्यामुळे बस डेपोबाहेर बसलेल्या आंदोलकांना ताब्यात घेण्याकरिता कंत्राटदाराने पोलीस विभागाच्या मदतीची मागणी केली होती. परंतु हा प्रशासनाचा अंतर्गत वाद असल्यामुळे तो प्रशासनानेच दूर करावा असे पोलीस विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. त्याच प्रकारे पोलीस बंदोबस्त केवळ बस संरक्षणाकरिता पुरवण्यात आला असल्याची माहिती काशिमीरा पोलीस विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारें यांनी दिली.

बस चालवण्याची जबाबदारी कंत्राटदाराची असल्यामुळे प्रशासन आता त्यात दाखल देणार नाही.

अजित मुठे, उपायुक्त, मीरा-भाईंदर महानगरपालिका