गेल्या आठवडय़ात आलेल्या क्यार वादळाचा फटका अर्नाळा येथील मच्छीमारांना बसला आहे. या वादळामुळे अर्नाळा येथील दोन बोटींचा समुद्रात संपर्क तुटल्याने अर्नाळा गावात तणावाचे वातावरण होते. पण रविवारी रात्री या बोटीचा संपर्क होऊन त्यांना वाचवण्यात यश आले आहे.

गेल्या आठवडय़ात हवामान खात्याने क्यार वादळाचा प्रभाव अरबी समुद्रात दिसणार आहे. त्याचा कोकण किनारपट्टीला धोका असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार अर्नाळा बेटातील तब्बल ७५० बोटी मासेमारीसाठी समुद्रात गेल्या होत्या. क्यार वादळाचा सतर्कतेचा इशारा भेटताच जवळपास सर्व बोटी अर्नाळा येथे परतल्या. परंतु ‘ओम नम: शिवाय’ व ‘शिव सागर’ या दोन्ही बोटींचा संपर्क होऊ शकला नाही. संपर्क तुटल्याने अर्नाळा येथील रहिवाशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या बोटींमध्ये जवळपास ३० खलाशी होते. शुक्रवारपासून रेडिओद्वारे त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न चालू होता, परंतु कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाही. त्यामुळे स्थानिकांनी भारतीय कोस्ट गार्ड आणि नौदल विभागाशी संपर्क साधला आणि त्यानंतर स्थानिकांच्या साहाय्याने कोस्ट गार्डने शोध मोहीम सुरू केली.

तब्बल २४ तासांनंतर या दोन्ही बोटींचा संपर्क झाला. रविवारी रात्री त्यांना नौदलाच्या मदतीने किनाऱ्यावर आणण्यात आले. यातील सर्व खलाशी सुखरूप परतले. बोट वादळात सापडल्याने रेडिओ संपर्क तुटला असल्याचे खलाशांनी सांगितले.