५५ मुली, २५ मुलांचा दोन वर्षांत शोध नाही; पोलिसांकडून‘ऑपरेश मुस्कान’ सुरू

पालघर जिल्ह्यातून गेल्या दोन वर्षांत बेपत्ता झालेल्या ६५९ जणांपैकी ८० जणांचा शोध अद्याप लागलेला नाही. दोन वर्षांत जिल्ह्यातून ६५९ जण बेपत्ता झाले होते, त्यापैकी ५७९ जणांचा शोध लागला आहे. मात्र उरलेल्या ८० जणांविषयीचे गूढ कायम आहे. या ८० जणांमध्ये ५५ अल्पवयीन मुली आणि २५ मुलांचा समावेश आहे. या मुला-मुलींच्या शोधासाठी पालघर पोलिसांनी ‘ऑपरेशन मुस्कान’ सुरू केले आहे.

बेपत्ता झालेली मुले जर अल्पवयीन असतील, तर अपहरणाचा गुन्हा दाखल होतो. मुलगी सज्ञान असेल तर पालकांच्या तक्रारीनंतरच अपहरणाचा गुन्हा दाखल होत असतो. प्रेमसंबंधातून बहुतांश मुले-मुली घर सोडून जात असतात. मात्र काही दिवसांनी ती घरी परततात किंवा मग त्यांचा शोध लागलेला असतो.

परंतु अद्याप अनेक बेपत्ता मुला-मुलींचा शोध लागला नाही. २०१५ पासून बेपत्ता आणि अपहरण झालेल्या ८० मुला-मुलींचा शोध लागलेला नाही.

ही सर्व मुले-मुली अल्पवयीन आहेत. ती कुठे गेली, कुणी त्यांचे अपहरण केले, ते जिवंत आहेत का मयत आहेत,

या प्रश्नांचे गूढ कायम आहे. त्यांच्या शोधासाठी पालक पोलीस ठाण्याच्या चकरा मारत आहेत. या मुलांचा शोध लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे.

missing-chart

तारुण्यात पदार्पण करणारी मुले आकर्षणाला प्रेम समजतात आणि स्वप्न रंगवून पळून जातात. वास्तवाचे भान आल्यावर ते परततात. परंतु तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. अद्याप बेपत्ता असलेल्या ८० मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करायला हवेत.

आरती वढेर, अध्यक्षा, जाणीव संस्था

मुला-मुलींचे घरातून पळून जाण्याचे प्रमाण वाढत असून ते गंभीर आहे. पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवायला हवे. गेल्या दोन वर्षांतील ८० बेपत्ता मुला-मुलींच्या शोधासाठी आम्ही आता १ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत खास ‘ऑपरेशन मुस्कान’ सुरू केलेले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यातील दोन अधिकारी आणि कर्चमारी या मोहिमेत सहभागी झाले आहेत. कुंटणखाना, लॉज आदींपासून विविध ठिकाणी तपासणी केली जाणार आहे.

अशोक होनमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पालघर स्थानिक गुन्हे शाखा

अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अपहरणाचे गुन्हे दाखल करतो. प्रत्येक गुन्ह्याकडे गांभीर्याने बघतो. गेल्या दोन वर्षांत पालघर जिल्ह्यातील बेपत्ता झालेल्या ६५० मुला-मुलींपैकी जवळपास ९० टक्के मुला-मुलींना शोधण्यात यश आले आहे. त्यासाठी केंद्र शासन तसेच गुन्हे अन्वेषण शाखेच्या माध्यमातून विविध योजना राबवत असतो. उर्वरित मुला-मुलींना शोधण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत असून त्यांचाही लवकरच शोध लावला जाईल.

प्रशांत बुरडे, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र