वसई : करोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी बहुजन विकास आघाडीने ‘मिशन सुपर ३०’ ही मोहीम आखली असून या मोहिमेअंतर्गत वसई-विरार महापालिका हद्दीत राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची जलद गतीने चाचणी होणार आहे. पक्षाचे कार्यकर्ते आपापल्या प्रभागात ताप मोजून नागरिकांची ऑक्सिजनची पातळी तपासणार आहेत. त्यामुळे संसर्गाच्या उंबरठय़ावर असणाऱ्या नागरिकांना विलगीकरण करून संसर्ग रोखता येऊ शकणार आहे.

वसई विरार शहरात करोनाचे रुग्ण १२ हजारांच्या वर गेले आहेत. सध्या शहरात २ हजार ९०० रुग्ण उपचार घेत आहेत. दररोज दोनशेच्या आसपास नवे रुग्ण आढळून येत आहेत. करोनाचा विषाणू वेगाने सर्वत्र पसरतोय. त्यामुळे त्याला वेळीच अटकाव करणे गरजेचे आहे. यासाठी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या संकल्पनेतून शहरातील प्रत्येक नागरिकाची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

ही मोहीम ३० दिवस चालणार आहे. यासाठी प्रत्येक प्रभागातील नागरिकांचा ताप मोजणे, ऑक्सिजनची पातळी तपासली जाणार आहे. त्यामुळे ज्याला संसर्गाची लक्षणे आहेत त्याला वेळीच करोना केंद्रात अलगीकरण केले जाणार आहे.

यामुळे त्या रुग्णाला वेळीच उपचार मिळेल आणि करोनाचा संसर्ग पसरण्यापासून रोखला जाईल, असे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले. अधिकाअधिक चाचण्या करण्यावर भर देण्यात येणार आहे.

साहित्याचे वाटप

यासाठी तापमान मोजणाऱ्या ५०० ‘टेंपरेचर गन’ आणि ५०० ऑक्झिमीटरचेही वाटप करण्यात आले आहे. नागरिकांना मुखपट्टय़ा, निर्जंतुकीकरणाचे साहित्यदेखील वाटण्यात येत आहे. आतापर्यंत १० हजार मुखपट्टय़ा आणि कोविड किटचे वाटप करण्यात आल्याची माहिती नालासोपाऱ्याचे आमदार क्षितिज ठाकूर यांनी दिली आहे.