12 December 2017

News Flash

KDMT : बसेसच्या दुरवस्थेविरोधात मनसेने काढली बसची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

काही बसेसचा वापर चक्क अंघोळ करण्यासाठी केला जातो.

ठाणे | Updated: May 18, 2017 11:35 PM

नवीन बसेसच्या दुरावस्थेविरोधात मनसेने अभिनव आंदोलन केले.

कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन अर्थात केडीएमटीच्या वापरात नसणाऱ्या नवीन बसेसच्या दुरवस्थेविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने बुधवारी अभिनव आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी केडीएमटीच्या बसची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून ती बस परिवहन अधिकाऱ्यांना भेट दिली. कल्याण (पूर्व) नेतीवली परिसरातील प्रसिद्ध मॉलशेजारी केडीएमटीची जागा असून त्याठिकाणी अनेक नव्या बस गेल्या कित्येक महिन्यांपासून धूळ खात पडल्या आहेत. जेएनएनयुआरएम अंतर्गत ६० नवीन बस ३ वर्षांपूर्वी केडीएमटीच्या ताफ्यात दाखल झाल्या.

कल्याण डोंबिवली महापालिकेने मोठ्या गाजावाजा करून या बसेस आल्याचा धिंडोरा पिटला. मात्र, आल्यापासून या सर्व नवीन बस धूळ खात डेपोतच उभ्या आहेत. गेल्या ३ वर्षांत या बसेसपैकी अनेक बसचे टायर गायब आहेत, तर काही इंजिनचे पार्ट गायब आहेत. याहून धक्कादायक म्हणजे याठिकाणी असणाऱ्या काही बसेसचा वापर चक्क अंघोळ करण्यासाठी केला जातो. या बस वापरात काढण्यासाठी आम्ही प्रशासनाला अनेक वेळा अर्ज दिले, विनंत्या केल्या. परंतू त्यांना केराची टोपली दाखवण्यात आल्याची माहिती मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी यावेळी दिली. दरम्यान या आंदोलनानंतरही महापालिकेने या बसेस वापरात काढल्या नाही, तर पालिका मुख्यालयात यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला आहे.

या आंदोलनात माजी आमदार प्रकाश भोईर, प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज प्रकाश घरत, विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर, गटनेते मंदार हळबे, सरोज भोईर, माजी नगरसेवक राजन मराठे यांच्यासह अनेक मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

First Published on May 18, 2017 3:07 pm

Web Title: mns protest against kalyan dombivali municipal transport