सहा महिन्यांत २६ मोबाइल लंपास; एकास अटक

लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हातावर फटका मारून त्यांचे मोबाइल चोरण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. जानेवारी ते जुलै या महिन्यांत या ‘फटका गँग’ने २६ प्रवाशांचे मोबाइल अशा पद्धतीने चोरले आहेत. वसई रेल्वे पोलिसांनी या टोळीतील एका सराईत मोबाइल चोराला अटक केली.

रेल्वेतून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. गर्दीमुळे प्रवासी लोकल ट्रेनच्या दारात उभे राहत असतात. त्याचा फायदा घेत मोबाइल चोरांची टोळी सक्रिय झाली आहे. रेल्वे रुळावर या टोळीतील गुंड दबा धरून बसतात आणि चालत्या गाडीतील प्रवाशांच्या हातावर मोठय़ा काठीने फटका मारून त्यांचा मोबाइल खाली पाडून पळवून नेतात.

जानेवारी ते जुलै या कालावधीत या टोळीने २६ प्रवाशांचे मोबाइल चोरले आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या वसई रेल्वे पोलिसांनी सनी प्रेमजी रफुकिया या आरोपीला अटक केली. त्याच्याकडून सहा चोरीचे मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत.

ट्रेनच्या दरवाजावर उभ्या असलेल्या प्रवाशाच्या मोबाइलवर फटका मारून त्याचा मोबाइल चोरी करीत असलेला सनीची चित्रफीत सीसीटीव्हीत कैद झाली होती. त्याच्या आधारे वसई रोड रेल्वे पोलिसांनी तपास करून त्याला अटक केली. तो वसईच्या वागरी पाडय़ात राहणारा आहे.

आम्ही फटका टोळीने चोरलेल्या १८ मोबाइलच्या गुन्ह्यंची उकल केली असून अन्य गुन्हेही लवकर उघडकीस आणू, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी सांगितले.