20 January 2018

News Flash

तलावातील मृतदेह शोधण्यासाठी आधुनिक प्रणाली

काही जण आत्महत्या करण्यासाठी तलावांचा मार्ग अवलंबतात.

खास प्रतिनिधी, ठाणे | Updated: August 11, 2017 2:29 AM

‘इमेजिंग सोनार’ या अत्याधुनिक प्रणालीच्या सहाय्याने तलावातील मृतदेह वा वस्तू शोधण्याचे प्रात्यक्षिक गुरुवारी तलावपाळी येथे दाखवण्यात आले.

तलावपाळीत प्रात्यक्षिके; यंत्रणा लवकरच महापालिकेच्या सेवेत

पावसाळ्यात खाडी तसेच तलावात बुडून मृत्युमुखी पडल्याच्या घटना वरचेवर घडत असतात. अशा प्रसंगी मृतदेह शोधून काढण्यात आपत्ती व्यवस्थापन तसेच अग्निशमन दलास प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. आता बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी नवे तंत्रज्ञान अमलात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. या संदर्भात ‘इमेजिंग सोनार’ या अत्याधुनिक प्रणालीचे सादरीकरण गुरुवारी तलावपाळी येथे करण्यात आले. या प्रणालीमुळे तलावाच्या तळाशी असलेला मृतदेह अथवा अन्य वस्तूचा तात्काळ शोध घेणे शक्य होणार आहे.

तलावांचे शहर अशी ख्याती असलेल्या ठाणे शहरात पूर्वी ७० तलाव होते. मात्र वाढत्या नागरीकरणाने त्यापैकी बरेच तलाव नामशेष होऊन त्यांची संख्या आता निम्म्यावर आली आहे. त्याचप्रमाणे ठाणे शहराच्या दोन्ही बाजूला खाडीकिनारा आहे. त्यामुळे खाडीत अथवा तलावात बुडण्याच्या घटना वरचेवर घडतात. काही जण आत्महत्या करण्यासाठी तलावांचा मार्ग अवलंबतात.

अशा घटनांनंतर आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाला पाण्यात उतरून मृतदेहांचा शोध घ्यावा लागतो. काही वेळेस पाणबुडय़ांमार्फत मृतदेहांचा शोध घेतला जातो. मात्र त्यानंतरही अनेकदा दोन ते तीन दिवस मृतदेहाचा शोध लागत नाही. त्यामुळे खाडी तसेच तलावांच्या सौंदर्याला बाधा पोहोचून मृतदेहाचीही हेळसांड होते. या पाश्र्वभूमीवर मृतदेह तात्काळ शोधून पाण्याबाहेर काढण्यासाठी महापालिका प्रशासनाने आता इमेजिंग सोनार प्रणालीचा वापर करण्याचा विचार सुरू केला असून या प्रणालीचे गुरुवारी ठाण्याच्या तलावपाळीमध्ये सादरीकरण करण्यात आले. परदेशात आणि नौदलामध्ये या प्रणालीचा वापर करण्यात येतो.

प्रणाली अशी आहे..

माशाच्या आकाराचे एक यंत्र पाण्यामध्ये सोडण्यात येते. तळाच्या खोलीपासून तीन ते चार फूट उंचीवर हे यंत्र ठेवण्यात येते आणि त्याला जोडण्यात आलेली यंत्रणा बोटीमध्ये ठेवण्यात येते. हे यंत्र बोटीच्या दोन्ही बाजूच्या शंभर मीटर अंतरावराचे छायाचित्र संगणकामध्ये दाखवते. बोटीमध्ये बसून संगणकाच्या आधारे पाण्यातील मृतदेह किंवा वस्तूंचा शोध घेता येतो, अशी माहिती काँग्सबर्ग कंपनीचे अधिकारी आनंद पाठक यांनी दिली.

First Published on August 11, 2017 2:29 am

Web Title: modern system to find dead bodies in lake tmc talao pali
  1. No Comments.