शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदारांचे भल्या पहाटे हाल

एसटी बंद होणार होणार म्हणता अखेर महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाने वसईतील २१ मार्गावरील सेवा बुधवारी पहाटेपासून बंद केली. याचा मोठा फटका प्रवाशांना बसला. या मार्गावर एसटी देत असलेल्या क्षमतेएवढीच सेवा देण्याचे पालिकेच्या परिवहन सेवेचा दावा पहिल्याच दिवशी फोल ठरला. बुधवारी पहाटे बस न आल्याने अनेक विद्यार्थ्यांना माघारी फिरावे लागले.

आर्थिक तोटय़ाचे कारण देत एसटीने वसईतून सेवा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला होता. याविरोधात वसईत आंदोलनेही सुरू आहेत. ‘जनआंदोलन समिती’ने एसटी बंद करू नये यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. न्यायालयाने या याचिकेवर ७ नोव्हेंबरला निर्णय देताना २१ मार्गावरील प्रवासी आणि विद्यार्थ्यांची  कुठलीही गैरसोय न होता महामंडळ आणि पालिका परिवहन सेवेने संयुक्तरीत्या वाहतूक सेवा देण्यास बंधनकारक असल्याचे नमूद केले होते. मात्र तरीही एसटी महामंडळाने पालिकेवर जबाबदारी सोपवून २१ मार्गावरील वाहतूक सेवा बंद केली.

एसटीच्या सेवेचा ५ डिसेंबर हा शेवटचा दिवस होता. मात्र त्याआधी महिनाभर एसटीच्या फेऱ्या कमी झाल्याने प्रवाशांची गैरसोय होतच होती. एसटीने बंद केलेल्या मार्गावर पालिकेने सेवा पुरविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यांचा दावा फोल ठरला.

गिरिज आणि भुईगाव या एसटी स्थानकात पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी एसटीची पहिली बस येते. परंतु ती बंद झाल्याने पालिकेची बस येईल, अपेक्षेने उभे राहिलेल्या शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच नोकरदारांचा पालिकेच्या बसनेही घात केला. पालिकेची बस साडेपाचच्या सुमारास आली. मात्र जास्तच उशीर झाल्याने अनेकांना घरी परतावे लागले. भुईगाव आणि गिरिज परिसरातील १६० विद्यार्थी बस वेळेत न आल्याने शाळा वा महाविद्यालय गाठता आले नाही, असा आरोप जनआंदोलन समितीने केला आहे.

सकाळी सहा वाजल्यापासून निर्मळ, भुईगाव, गास, गिरिज परिसरातील विद्यार्थी शाळा वा महाविद्यालयात जातात. यात सेंट अँथोनी कॉन्व्हेंट हायस्कूल, कोळीवाडा, न्यू इंग्लिश स्कूल आणि कॉलेज, वसई, सेंट थॉमस बाप्टिस्टा ज्युनिअर कॉलेज, पापडी आणि सेंट गोन्सालो गार्सिया महाविद्यालयांचा समावेश आहे. यासाठी बुधवारी पालिका परिवहनने बस वेळेत सोडल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल जनआंदोलन समितीच्या कार्याध्यक्ष डॉमनिका डाबरे यांनी केला आहे. दरम्यान, एसटीने सेवा बंद केली असली तरी रानगाव, उमराळे व सत्पाळा मार्गे राजोडी मार्गावरील सेवा दोन महिने चालविली जाईल.

कुठलीही नवीन गोष्ट सुरू केली की ती रुळायला वेळ लागतो. आज पहिलाच दिवस होता. नव्या मार्गावर एसटीचे वेळापत्रक जुळायला वेळ लागेल. पण लवकरच एसटीच्या तुलनेत सेवा देऊ .

भरत गुप्ता, परिवहन सभापती, वसई-विरार महानगरपालिका