अपारंपरिक ऊर्जेविषयी विद्यार्थ्यांना माहिती
विजेची वाढती मागणी पाहता येत्या काळात अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा अधिक वापर करण्यात यावा. आतापासून नवीन पिढीला त्याचे वळण लागावे. अपारंपरिक ऊर्जानिर्मितीमागील घटक व त्याची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी या उद्देशातून मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा व या भागातील हायस्कूलच्या सुमारे सहाशे विद्यार्थ्यांसाठी महासूर्यकुंभ कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमाला केशवसृष्टीच्या डॉ. अस्मिता हेगडे, विमल केडिया, फाऊंडेशचे अध्यक्ष संजय हेगडे, दीपाली देवळे, विशाल देसाई, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख गोपाळ सोनावळे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या ‘वाचन प्रेरणा दिना’चे औचित्य साधून भाईंदरची केशवसृष्टी व दादर येथील सेवा सहयोग फाऊंडेशन यांच्या सहकार्याने महासूर्यकुंभ कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती. मुरबाड परिसरातील झाडघर, वैशाखरे, टोकावडे, मांदोशी, वेळुक या जिल्हा परिषद शाळा, टेंभुर्ली येथील सह्य़ाद्री हायस्कूलचे विद्यार्थी, ग्रामस्थ, शिक्षकांनी या उपक्रमात भाग घेतला. इयत्ता चौथी ते सातवीचे विद्यार्थी उपक्रमात सहभागी झाले होते.
पवई येथील आयआयटीच्या विद्यार्थ्यांने सौर ऊर्जेवर चालणारा कुकर तयार केला आहे. या कुकरच्या माध्यमातून अपारंपरिक ऊर्जा स्रोताच्या माध्यमातून अन्न कसे शिजवावे याची माहिती देण्यात आली.