पावसाचे पाणी जाण्याचा मार्ग बंद झाल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची भीती

लोकसत्ता वार्ताहर

वसई:  नायगाव पूर्वेतील मुख्य रस्तावर  पावसाचे व समुद्राच्या  भरतीचे ये जा करण्यासाठी तयार केलेल्या उघाडय़ा  माती भराव व इतर विकास कामे यामुळे बुजविल्या जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे या भागातील उघाडय़ा हळूहळू नामशेष होऊ लागल्या आहेत.

नायगाव पूर्वेतील परिसरात बापाणे ते नायगाव स्थानक असा मुख्य रस्ता गेला आहे. याच रस्त्यावर विविध ठिकाणच्या भागात पाणी जाण्यासाठी उघाडय़ा बांधण्यात आल्या होत्या. परंतु या बांधण्यात आलेल्या उघाडय़ांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने उघाडय़ा बिनदास्तपणे बुजविल्या जात आहे. सध्या स्थितीत नायगाव पूर्वेतील नागरीकरण झपाटय़ाने वाढू लागले आहे. त्यामुळे रस्त्याच्या  जवळ असलेल्या उघाडय़ांच्या लगतच अनेक विकास कामे होऊ लागली आहेत. या विकास कामामुळे मात्र उघाडय़ा बुजविल्या जात असल्याचे चित्र दिसून येते. सुरुवातीच्या काळात बापाणे, वाकीपाडा, चंद्रपाडा, जूचंद्र, नायगाव स्टेशनकडे जाणारा परिसर अशा सर्व ठिकाणी मिळून पंधराहुन अधिक उघाडय़ा होत्या. या उघाडय़ामुळे पावसाचे पाणी , समुद्रातील भरतीचे पाणी व इतर सांडपाणी याचा निचरा होण्यास मदत होत होती. परंतु मागील काही वर्षांंत यातील बहुतांश उघाडय़ा माती भराव टाकून बुजवून टाकल्या आहेत. यामुळे पावसाचे पाणी  व इतर सांडपाणी याचा निचरा कसा होणार असा प्रश्न येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

या अशा परिस्थितीमुळे मागील तीन ते चार वर्षांंपासून नायगाव ते बापाणे या रस्त्यावरील विविध ठिकाणच्या भागात पावसाळ्यात पाणी साचून राहते. याचा परिणाम हा येथील वाहतुकीवर होत असतो. यासाठी या बांधलेल्या उघाडय़ाकडे महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी लक्ष देऊन बुजविण्यात आलेल्या उघाडय़ा पूर्ववत कराव्या अशी मागणी समाजसेवक एकनाथ पाटील यांनी केली आहे.

पूरस्थिती निर्माण होण्याची भीती

मागील तीन ते चार वर्षांंपासून पावसाळ्यात वसई-विरार शहर पाण्याखाली जाते यामध्ये नायगाव पूर्वेतीलही काही परिसराचा समावेश आहे. याआधीच रस्त्यालगत झालेला माती भराव यामुळे पाणी जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे पाणी जाण्याचा उघाडय़ा हा एकमेव मार्ग होता परंतु तो मार्ग ही आता बुजविला जात असल्याने भविष्यात मोठी पूरस्थिती निर्माण होण्याची भीती येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

ज्या उघाडय़ातून दोन्ही बाजूने पाणी ये-जा होते अशा उघाडय़ा दरवर्षी पालिकेकडून स्वच्छ केल्या जात आहेत. आता ज्या उघाडय़ा बुजविल्या जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यांचे सर्वेक्षण करून त्यावर उपाययोजना केल्या जातील.
— राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता महापालिका

उघाडय़ामध्ये जे नाले तुंबलेले आहेत त्यानाल्याची आमच्या विभागाकडून साफसफाई केले जाईल. परंतु नाल्याच्या इतर भागात जे अतिक्रमण झालेले ती कारवाई पालिकेच्या अखत्यारीत येत आहे.
— प्रशांत ठाकरे, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वसई