ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे अडचणीत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आणि नगरसेवक नजीब मुल्ला यांनी मंगळवारी शहराध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे दिला आहे.
सूरज परमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये नजीब मुल्ला यांच्यासह चार नगरसेवकांची नावे पुढे आली होती. त्या आधारे ठाणे पोलिसांनी या चारही नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात अटक होऊ नये म्हणून चारही नगरसेवकांनी ठाणे न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केले होते, मात्र न्यायालयाने चौघांचेही अर्ज फेटाळून लावले होते. त्यामुळे या चारही नगरसेवकांनी जामीन मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती, परंतु उच्च न्यायालयानेही चौघांचे जामीन फेटाळून लावले आहेत. त्यामुळे या प्रकरणात त्यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ठाणे शहराध्यक्षपदी नजीब मुल्ला यांची काही महिन्यांपूर्वीच नियुक्ती झाली होती. तसेच मुल्ला हे ठाणे महापालिकेतील नगरसेवक आहेत.
दरम्यान, मंगळवारी उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर आरोपी नजीब मुल्ला यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे पाठविला आहे.