शिवसेना, काँग्रेसमध्येही बंडखोरीची शक्यता

ठाणे : गणेश नाईक यांची पावले भाजपच्या दिशेने पडू लागल्याने नवी मुंबईतून राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्णत: वाताहत होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. नाईकांसोबत राष्ट्रवादीतील नगरसेवकांचा मोठा गट भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने पक्षाची पडझड सावरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कळवा-मुंब्य्राचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि माथाडी नेते आमदार शशिकांत शिंदे यांना नवी मुंबईच्या मोहिमेवर पाठवले आहे. पक्षातील नाईकविरोधी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये जाण्यापासून रोखण्यासोबतच भाजपच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे व शिवसेनेचे नेते विजय चौगुले यांच्याशी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संपर्क साधल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, नाईक यांच्या पक्षांतरामुळे नवी मुंबईतून राष्ट्रवादी काँग्रेस कोलमडण्याची स्थिती असताना शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांनादेखील बंडखोरीची चिंता सतावू लागली आहे. त्यामुळेच शिवसेनेतील जिल्हा पातळीवरील नेत्यांनी नवी मुंबईतील नगरसेवकांची तातडीची बैठक येत्या दोन दिवसांत आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, यादृष्टीने सोमवारी महापौर बंगल्यावर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बैठक बोलावून वातावरण निर्मिती करण्यात आली. नाईक यांच्यासह राष्ट्रवादीतील मोठा गट भाजपमध्ये प्रवेश करेल, असेही दाखवण्यात आले आहे. मात्र, तरीही पक्षातील दुसरा गट नाईक यांच्या भाजपप्रवेशाबाबत समाधानी नसल्याची चर्चा आहे. नवी मुंबईत जुन्नर, आंबेगाव तालुक्यासह पश्चिम महाराष्ट्रातील मतदारांचा मोठा भरणा आहे. याशिवाय माथाडी, व्यापारी अशा वर्गातून निवडून आलेल्या नगरसेवकांचाही यामध्ये समावेश आहे. यापैकी काही नगरसेवकांचे काँग्रेस-राष्ट्रवादीमधील वरिष्ठ नेत्यांची सलोख्याचे संबंध असून या मंडळींनी नाईक यांच्या बंडात सहभागी होऊ नये, यासाठी राष्ट्रवादीने प्रयत्न चालवले आहेत. नेरूळ सीवूड परिसरातील राष्ट्रवादीच्या एका बडय़ा नगरसेवकावर पवारनिष्ठांच्या संपर्कात राहण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड आणि शशिकांत शिंदे यांनीही पक्षातील बंडखोरी थोपवण्यासाठी नवी मुंबईतील स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू केल्याचे समजते.

शिवसेनेतही गळती?

नाईक यांच्या भाजप प्रवेशामुळे शिवसेना नेतेही कमालिचे सावध झाले असून ऐरोली तसेच बेलापूर विधानसभा मतदारसंघातील पक्षाच्या नगरसेवकांना नेत्यांकडून संपर्क साधला जात आहे. दीड वर्षांपुर्वी झालेल्या महापौर निवडणूकी दरम्यान शिवसेनेचे काही नगरसेवक नाईक यांच्या संपर्कात होते अशी चर्चा होती. विशेषत ऐरोली विधानसभा क्षेत्रातील काही शिवसेना नगरसेवकांशी संदीप नाईक यांनी संधान बांधल्याचीही चर्चा आहे. भाजप प्रवेशामुळे राज्यातील सत्तेची ताकद नाईक यांच्या मागे उभी रहाणार असल्याने शिवसेनेतील नाराजांचा गळाला लावण्याचा प्रयत्नही होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे ठाण्यातील शिवसेनेच्या नेत्यांनी नवी मुंबईतील घडामोडींचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.